थंडीच्या लाटेत दिल्लीकर गारठले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 डिसेंबर 2019

गोरगरिबांची करुण अवस्था
दिल्लीतील जीवघेण्या गारठ्यात गोरगरिबांची अवस्था अतिशय करुण आहे. दिल्ली सरकारने उभारलेल्या आश्रयगृहांत (रैन बसेरा) हे हजारो अभागी जीव आपल्या चिमुकल्यांसह कुडकुडत रात्र काढतात, ते दृश्‍य अंगावर काटा आणणारे असते. गरीबांना उबदार कपडे व ब्लॅंकेट वाटण्याचे ‘फोटो सेशन’ झाले की उच्चपदस्थांसह संबंधित कार्यकर्तेही गायब होतात, असा अनुभव हा वर्ग घेत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र-एनसीआरमधे नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनांनी राजकीय हवा तापली असली तरी सर्वसामान्य दिल्लीकर थंडीच्या तीव्र लाटेत कुडकुडले असून दिल्ली अक्षरशः गोठल्यासारखी स्थिती आहे. डिसेंबरमधील थंडीने यंदा गेल्या पाच वर्षांतील विक्रमही तोडला असून, रात्रीच्या वेळेस पारा ४ ते ५ अंशांपर्यंत, तर दिवसा तो ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत दिल्लीकरांना थंडीचा प्रकोप झेलावा लागणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. एनसीआरमधील नारनौल येथे सर्वांत कमी म्हणजे १.२ अंश सेल्सिअस तापमानाची काल (ता. २३) नोंद झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेला आठवडाभर दिल्लीकर धूर-धुक्‍याचा पडदा व प्रचंड थंडीने गारठले आहेत. सायंकाळी पाचनंतर अंधार पडल्यावर तर गारठ्याची तीव्रता वाढते व उबदार कपड्यांची आवरणे नसतील तर गार वारे अंगाला सुईप्रमाणे टोचत राहतात असाही अनुभव आहे. 

'मोदी आणि शहांची विधाने परस्परविरोधी'

गेले दोन दिवस इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणे अपुऱ्या दृश्‍यमानेमुळे रद्द करावी लागली आहेत. याला प्रदूषित हवेची जोड आहेच. गुरुग्राम वगळता संपूर्ण एनसीआरमध्ये वायू गुणवत्ता सूचकांक अतिखराब श्रेणीत आला आहे. दिल्लीत सोमवारपासून हा सूचकांक ३२७ राहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold increase in delhi