अब्दुल बसित धादांत खोटं बोलतायत, शोभा डेंनी दिलं स्पष्टीकरण

अब्दुल बसित धादांत खोटं बोलतायत, शोभा डेंनी दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतिय लेखिका शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्यावरुन सरकारविरोधी लेख लिहिला होता अशी खळबळजनक माहिती पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली आहे. यानंतर ट्विटरवर शोभा डे यांच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला. अनेकजण निषेध व्यक्त करत असतानाच शोभा डे यांनी अब्दुल बासित यांनी दिलेल्या माहितीवर स्पष्टीकरण देत ते पूर्णपणे खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे.

हा माझा खूप मोठा अपमान असून मी एक अभिमानी आणि देशभक्त भारतीय आहे, असे स्पष्टीकरण शोभा डे यांनी दिले आहे. शोभा डे यांनी सांगितले की, खरं तर मी यावर काही प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली नसती. पण खोटं उघडं पाडणं गरजेचं आहे. खासकरुन जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीकडून माझीच नाही तर भारताची बदनामी करण्याच प्रयत्न केला जातो. आपली आणि अब्दुल बासित यांची फक्त एकदाच भेट झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या जयपूर साहित्य संमेलनात आम्ही गप्पा मारत असताना त्यांनी घुसखोरी करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित कऱण्याचा प्रयत्न केला. फक्त तीन मिनिटं ते आमच्यासोबत होते. यावेळी त्यांनी चीनचा उल्लेख केला होता, अशी माहिती शोभा डे यांनी दिली. तो आमच्या भेटीचा शेवटचा क्षण होता असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.

सोबतच अब्दुल बासित ज्या लेखाचा उल्लेख करत आहेत तो 2016चा असल्याची माहिती शोभा डे यांनी दिली आहे. अब्दुल बासित जे करत आहेत ते सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी धोकादायक, द्वेषयुक्त आणि अन्यायकारक आहे. माझा खूप मोठा अपमान झाला असून मी नाराज आहे, असंही शोभा डे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
दहशतवादी बुऱ्हान वाणीला ठार करण्यात आलं, त्यानंतर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी शोभा डे यांच्यासह इतर काही पत्रकारांची भेट घेतली होती. शोभा डे भारताविरोधात लेख लिहिण्यास तयार झाल्या. काश्मीरमधली परिस्थिती, बुऱ्हान वाणीचा मृत्यू या सगळ्याबाबत पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावरुन शोभा डे यांनी एक लिहिला होता, असा खुलासा आता अब्दुल बासित यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘Burhan Wani is dead but he’ll live on till we find out what Kashmir really wants’ हा मथळा असलेला लेख शोभा डे यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन लिहिला होता असा दावा अब्दुल बासित यांनी केला आहे. मी भारतातल्या काही पत्रकारांना भेटलो मात्र त्यांनी काश्मीरबाबत लेख लिहिण्यास नकार दिला. यादरम्यान माझी भेट शोभा डे यांच्याशी झाली. त्या मला खूपच नम्र वाटल्या. मग मी त्यांना काश्मीर प्रश्नावर एक लेख लिहिण्याची विनंती केली जी त्यांनी मान्य केली. पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर शोभा डे यांनी लेख लिहिला, असं अब्दुल बासित यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com