विनोदी अभिनेता फारुकीची सुटका

वृत्तसंस्था
Monday, 8 February 2021

फारुकी ३२ वर्षांचा असून तो मुळचा सौराष्ट्रातील जुनागडचा रहिवासी आहे. इंदूरमधील कार्यक्रमात त्याने हिंदू देवतांविषयी अश्लील विनोद केल्याची तक्रार एकलव्यसिंह गौड यांनी केली होती.

इंदूर - सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारुकीची अखेर शनिवारी रात्री ११ वाजता इंदूरमधील कारागृहातून सुटका करण्यात आली.

हिंदू देवी-देवतांबाबत तसेच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याविषयी बीभत्स आणि अनुचित विनोद केल्याच्या आरोपावरून त्याला गेल्या एक महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात ठेवण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याची सुटका होण्याच्या काही तास आधी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली नसल्याचा दावा केला होता. सुटकेनंतर फारुकी मुंबईला रवाना झाला. त्याआधी त्याने सांगितले की, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. माझा न्यायालयीन प्रशासनावर संपूर्ण विश्वास आहे. या टप्प्यास कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणे मला आवडणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे, तर उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटला स्थगिती दिली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फारुकी ३२ वर्षांचा असून तो मुळचा सौराष्ट्रातील जुनागडचा रहिवासी आहे. इंदूरमधील कार्यक्रमात त्याने हिंदू देवतांविषयी अश्लील विनोद केल्याची तक्रार एकलव्यसिंह गौड यांनी केली होती. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदार मालिनी यांचे पुत्र आहेत. ते हिंदू रक्षक संघटनेचे प्रमुख आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायाधीशांचा फोन...
कारागृह अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत न मिळाल्याचे कारण दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी इंदूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. संकेतस्थळावर निकालाची प्रत अपलोड करण्यात आल्याचे त्यांनी कळविले. त्याची खातरजमा झाल्यानंतर अखेर फारुकीला सोडण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comedian actor Munawar-faruqui released