मुनव्वर फारुकीबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

हिंदू देव-देवतांचा अपमान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली- हिंदू देव-देवतांचा अपमान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. पण, फारुकी विरोधात अद्यापपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नसल्याची माहिती इंदूर पोलिसांनी दिली आहे. फारुकीसह पाच जणांना दोन जानेवारीला पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांविरोधात भाजप आमदाराच्या मुलाने तक्रार दाखल केली होती.

बलाढ्य चीनला अफगाणिस्तानने झुकवलं; एका महिलेसह 10 हेरांची गुपचूप सुटका

भाजप आमदाराच्या मुलाने फारुकी विरोधात तक्रार दाखल करत पोलिसांना दोन व्हिडिओ फुटेज दिले होते. या फुटेजमध्ये काहीही द्वेषपूर्ण नसल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तक्रारदाराने दिलेल्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमध्ये काहीही द्वेषपूर्ण आढळलेले नाही, असं एसएचओ कमलेश शर्मा यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

मध्य प्रदेश पोलिसांनी मुनव्वर फारुकी आणि अन्य चौघांवर कलम 295 ए, 298, 269 आणि 34 कलमातंर्गत आरोप ठेवले. सर्व आरोपींना 2 जानेवारीला इंदूर डिस्ट्रिक्ट कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

2020 मध्ये स्टार्टअप्सची संख्या घटली; 75 टक्क्यांहून अधिक पडणार बंद?

दरम्यान, इंदौरच्या एका कॅफेमध्ये 2 जानेवारीला कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने आपला परफॉर्मंस दिला. या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण सिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड आपल्या मित्रांसोबत गेला होता. मुनव्वर फारुकी आपला परफॉर्मंस करताना हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह कॉमेडी केल्याचा आरोप एकलव्य यांनी केला आहे. कॉमेडीदरम्यान एकलव्य सिंह गौड भडकले आणि त्यांनी याला विरोध केला. त्यानंतर प्रकरण वाढले आणि कार्यक्रमाला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एकलव्य 'हिंदू रक्षक' नावाच्या स्थानिक संघटनेचे संयोजक आहेत. माध्यमातील काही बातम्यांनुसार कॅफेमधील गोंधळादरम्यान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुनव्वर फारुकीला मारहाण केली, पण एकलव्य यांनी आरोप फेटाळून लावला आहे. कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि चार स्थानिक लोकांविरोधात 2 जानेवारीला रात्री उशीरा तक्रार दाखल करुन घेण्यात आली होती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: comedian munawar faruqui arrest case indore police big comment