देशाविरुद्धच्या टिपणीबद्दल वीर दास विरुद्ध तक्रार | Veer Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das
देशाविरुद्धच्या टिपणीबद्दल वीर दास विरुद्ध तक्रार

देशाविरुद्धच्या टिपणीबद्दल वीर दास विरुद्ध तक्रार

नवी दिल्ली - आपल्या‘ स्टॅन्ड अप’ कॉमेडी शोमध्ये भारताबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिपणी केल्याच्या आरोपावरून वीर दास याच्या विरोधात दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील आदित्य झा याने ही तक्रार दाखल केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि शशी थरूर यांनी मात्र या प्रकरणी वीर दासचे समर्थन केले आहे.

वीर दास याने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील जॉन एफ केनेडी सेंटर ऑफ परफॉर्मिंग येथे सादर केलेल्या ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला होता. या व्हिडिओत तो म्हणतो, ‘‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते, तर रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान आहे, पण आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर धावून जातो.’’ यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी या टिपणीसाठी वीर दासवर टीका केली. मात्र टीकेनंतर त्याने ‘देशाचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. प्रत्येक देशाची चांगली आणि वाईट बाजू असते. केवळ उपहासात्मक पद्धतीने या बाजू मांडण्याचा माझा प्रयत्न होता,’ असा खुलासा करणारे ‘ट्विट’ त्याने केले.

हेही वाचा: चंद्रग्रहण 2021: 580 वर्षानंतर येणार असा योग

काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि कपिल सिब्बल यांनी मात्र वीर दास याला आपला पाठिंबा जाहीर केला. ‘‘आपल्या देशातही काही नकारात्मक गोष्टी असल्याचे आपण नाकारू शकत नाही. भारतीय म्हणून हे जगाला न दाखवण्याचा आपला अट्टहास आहे. आपण असहिष्णू आणि दुटप्पी आहोत,’ असे सिब्बल यांनी म्हटले. तर थरूर यांनी वीर दास याने नैतिकदृष्ट्या जे सत्य आहे, ते बोलण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. मात्र काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ‘काही मोजक्या व्यक्तींनी केलेल्या वाईट कृत्यांसाठी संपूर्ण देशाला जबाबदार ठरवणे, चुकीचे आहे,’ असे मत मांडत दास याच्या टिपणीचा निषेध केला.

loading image
go to top