
ज्योतिरादित्य शिंदे ज्या गाडीतून मुरैनामध्ये रोड शो करत आहेत ती गाडी पोलिसांची आहे. मात्र त्या गाडीवर कुठेही पोलिस असे लिहलेले नाही. काँग्रेसने हा दावा गाडीच्या नंबरवरुन केला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवरुन वाद; काय आहे नेमकं प्रकरण
भोपाळ : ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेश काँग्रेस सातत्याने अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. ज्योतिरादित्य शिंदे देखील आपल्या प्रचारसभांमधून काँग्रेसवर जोरदार टिका करत आहेत. अशातच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवरुन आरोप लावले आहेत. काँग्रेसचा असा आरोप आहे की, ज्योतिरादित्य शिंदे ज्या गाडीतून मुरैनामध्ये रोड शो करत आहेत ती गाडी पोलिसांची आहे. मात्र त्या गाडीवर कुठेही पोलिस असे लिहलेले नाही. काँग्रेसने हा दावा गाडीच्या नंबरवरुन केला आहे. कारण मध्यप्रदेशात प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे नंबर दिले जातात. काँग्रेसचे प्रवक्ता केके मिश्रा यांनी एक फोटो पोस्ट करुन या विषयाला वाचा फोडली आहे.
हे वाचा - आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरू
ज्योतिरादित्य शिंदेजी, तुम्ही मध्यप्रदेशचे डीजीपी आहात, एडीजी आहात, आयजी आहात की डीआयजी आहात? आपण कोणत्या अधिकाराअंतर्गत पोलिसांची गाडी वापरुन प्रचार करत आहात? आम्ही तर ऐकलंय की आपलं शिक्षण परदेशात झालं आहे. असे ट्विट करत मिश्रा यांनी शिंदेंवर टिकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या या आरोपावर अजूनतरी भाजप मूग गिळून गप्प आहे. नंबर ज्याप्रकारे दिले जातात त्याआधारावर पाहिलं तर शिंदे ज्या वाहनातून फिरत आहेत ते वाहन मध्यप्रदेश पोलिसांचीच आहे. परंतु, गाडी कुणाची आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेसने या मुद्यावरुन शिंदेची कोंडी करत सरकारला धारेवर धरले आहे.
काय आहे मध्यप्रदेशमध्ये नंबर प्रणाली?
मध्यप्रदेशात MP-01 आणि MP-02 सरकारी गाड्यांसाठी आरक्षित आहे. तर, MP-03 हा नंबर पोलिसांच्या गाड्यांसाठी राखिव आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे हे ज्या गाडीवर होते त्या गाडीचा नंबर हा MP-03 A 6271 असा होता. या नंबरवरुन तरी ही गाडी पोलिसांचीच असल्याचं समजतं. नियमानुसार पोलिसांच्या गाडीचा वापर हा कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी केला जाऊ शकत नाही.
सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना; राहुल गांधीसुद्धा सोबत
शिंदेचाही काँग्रेसवर प्रहार
ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मुरैनामध्ये काँग्रेसवर टिका करताना म्हटले आहे की, काँग्रेस दिलेल्या वचनांना धर्मग्रंथ म्हणवते. परंतु, पक्षाचे प्रमुख नेते मुरैनामध्ये येतात आणि शेतकरी बांधवांना वचन देऊन जातात की 10 दिवसांच्या आत तुमचे कर्ज माफ नाही झाले तर आम्ही मुख्यमंत्री बदलू. पण 10 दिवस नव्हे तर 10 महिने झाले तरी अजून कर्ज माफ झालेले नाही. दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी मध्यप्रदेशच्या लोकांची फसवणूक केली आहे.
Web Title: Confict Over Jyotiraditya Scindias Vehicle
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..