गोव्यात दोन मातब्बर राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष

गोव्यात दोन मातब्बर राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष

मडगाव : मडगावला स्वतंत्र करा, असा नारा देऊन नगरनियोजनमंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनाच आव्हान दिले आहे. सरदेसाई यांच्या या पवित्र्यामुळे काही वर्षांपूर्वी एकमेकांचे जवळचे मित्र असलेल्या या नेत्यांमध्ये वितुष्ट आल्याचे उघड झाले आहे. सरदेसाई यांनी थेट मडगाव मतदारसंघातच आक्रमण करण्याची भषा करून दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष उघड केला आहे. 

दीड वर्षांपूर्वी राजकीय वाटा वेगळ्या झालेले कामत व सरदेसाई यांच्यातील छुप्या संघर्षाची धग काही महिन्यांपासून मडगाव पालिकेच्या राजकारणात जाणवत होती. कामत यांच्या गटातील डोरीस टेक्सेरा यांना उपनगराध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी सरदेसाई यांच्या गटातील टिटो कार्दोझ यांच्या निवडीनंतर या नेत्यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या उडत होत्या. पालिका मंडळाच्या बैठकीत या नेत्यांमधील संघर्ष उघडपणे दिसत होता. पण, मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालयात गोवा मुक्तीदिन सोहळ्यात बोलताना सरदेसाई यांनी मडगाव शहरावरून थेट कामत यांच्यावरच हल्ला चढवला. 

विकासाबाबत मडगाव शहराकडे झालेल्या दुर्लक्षापासून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज आहे, असे आवाहन सरदेसाई यांनी मुक्तीदिन सोहळ्यातील भाषणात केले. पुढच्या गोवा मुक्ती दिनापर्यंत मडगावात भव्य बसस्थानक प्रकल्प व मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

काँग्रेसकडून सासष्टीकडे व त्यातही मडगावकडे दुर्लक्ष झाले. सरकारविरुद्ध जनआक्रोश आणि राग आहे, असे कामत म्हणतात. तेव्हा त्यांनी याचेही स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशा शब्दांत सरदेसाई यांनी आपल्या आक्रमक भाषणामागील भूमिका स्पष्ट केली. कामत मुख्यमंत्री असताना बसस्थानक व कब्रस्तान मार्गी का लागले नाही, असा सवाल त्यांनी केला. काॅंग्रेसकडून हे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले. तुम्ही दुसऱ्यावर टीका करत असल्यास तुम्ही आत्मपरीक्षणही केले पाहिजे, असे सरदेसाई यांनी सांगितले. 

मडगावकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या टीकेला कामत यांनी जनआक्रोश यात्रेच्या मडगावमध्ये झालेल्या सभेत प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने मडगावमध्ये काहीच केले नाही हा आरोप तथ्यहीन आहे. काँग्रेस राजवटीत उभारण्यात आलेली मडगावमधील जिल्हाधिकारी कचेरीची इमारत ही देशातील सर्वोत्कृष्ट आहे, असे कामत यांनी सांगितले. 

जिल्हा इस्पितळाचे काम अद्याप पूर्ण होत नाही. 2012 नंतर तर आमची सत्ताही नाही. पण, 2012 मध्ये या इस्पितळ इमारतीचा मूळ आराखडा उभा झाला होता. पण, नंतर या महत्वाच्या इस्पितळाचे काम रखडले. भाजपप्रणित युती सरकारांच्या राजवटीत या इस्पितळाच्या इमारतीस भेट दिलेला प्रत्येक मंत्री-मुख्यमंत्र्यांनी उद्घघाटनाच्या केवळ तारखाच दिल्या. पण, अद्याप हे इस्पितळ पूर्ण झालेले नाही. कदाचित 2019 मध्ये काॅंग्रेसचे सरकार सत्तेत येऊन या इस्पितळाचे उद्घाटन व्हावे, असे विधिलिखीत असावे` असे भाष्य कामत यांनी केले. 

विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी कामत व सरदेसाई यांच्यात मैत्रीचे संबंध होते. कामत हे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सरदेसाई हे युवा काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष व गोवा प्रदेश काॅंग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने सरदेसाई यांनी काॅंग्रेसचा त्याग केला होता. तथापि, कामत व सरदेसाई यांच्यातील मैत्री अबाधित राहिली होती. तीन वर्षांपूर्वी मडगाव पालिकेची निवडणूक या दोन्ही नेत्यांच्या पॅनलनी एकत्र येऊन लढवली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरदेसाई यांनी भाजपप्रणित युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com