esakal | रांची : नमाज कक्षावरून गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

झारखंड विधानसभा

रांची : नमाज कक्षावरून गोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रांची (पीटीआय)ः झारखंड विधानसभेत नमाज कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करत भाजप आमदारांनी आज गोंधळ घातला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी नमाज कक्षासह राज्य सरकारच्या रोजगार धोरणाला विरोध दर्शवित घोषबाजीस सुरूवात केली. विधानसभा अध्यक्ष रविंद्र नाथ महातो यांनी त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

मात्र, प्रश्नोत्तराच्या तासातही गदारोळ कायम राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज दुपारी साडेबारापर्यंत तहकूब केले. अध्यक्षपदाचा अनादर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर तुम्ही रागावला असाल, तर मला मारा पण कामकाज थांबवू नका, असे वैफल्यग्रस्त उद्‌गार रविंद्र नाथ यांनी भाजप आमदारांना उद्देशून काढले. तुमच्या वर्तनामुळे मी दु:खी झालो आहे. अध्यक्षपदाची खुर्ची काही चेष्टेचा विषय नाही. हा झारखंडमधील साडेतीन कोटी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तुमचे वर्तन वेदनादायक आहे, असेही त्यांनी सुनावले. हनुमान चालिसेचा राजकीय फायद्यासाठी वापर न करता आदर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा: हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

काय आहे प्रकरण?

झारखंड विधानसभेत नमाज पठण करण्यासाठी खोली देण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला आहे. मात्र, भाजपने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हा आदेश मागे घेण्याची मागणी करत भाजपने सोमवारीही कामकाज रोखून धरले होते.

"विधानसभा अध्यक्षांचे वक्तव्य भावनिक आहे. सभागृहात अध्यक्ष हे सर्वोच्च असतात. मात्र, त्यांचे वर्तन निष्पक्ष नसल्याने आम्हीही दुखावले गेलो आहोत."

- सी.पी. सिंह, आमदार, भाजप

loading image
go to top