'लेटरबॉम्ब'नंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; आझाद यांचे पद घेतले काढून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

 काँग्रेस पक्षाने आज आकस्मिकपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज आकस्मिकपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत. यात महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी एच. के. पाटील या दुसऱ्या कर्नाटकी नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी मध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. काँग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटच्या नेत्याकडे दिली आहे.

काँग्रेसने संघटनात्मक बदल आज रात्री उशिरा जाहीर केले. सोनिया गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे आली आहे. नव्या बदलामध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत.

गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, खर्गे, मोतीलाल व्होरा यांना सरचिटणीस म्हणून दूर करण्यात आले आहे. मात्र व्होरा वगळता अन्य तिघांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक या असंतुष्ट २३ मधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देणे महत्त्वपूर्ण आहे. पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये परतलेले तारिक अन्वर यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांना कायम निमंत्रित म्हणून ठेवण्यात आले आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे असलेली सरचिटणीस कार्यालय प्रशासनाची जबाबदारी पवनकुमार बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मदत समिती
अखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत सोनिया गांधी यांनी दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यांचे प्रभारी बदलले
काही राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून, त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. हरियानाच्या जबाबदारीतून गुलामनबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

काँग्रेसची कार्यकारिणी
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटनी, अहमद पटेल, गुलामनबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा, हरीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, ओमेन चंडी, राजस्थानचे प्रभारी अजय माकन, राहुल यांचे विश्‍वासू भँवर जितेंद्रसिंह, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला.
कायम निमंत्रित ः दिग्विजयसिंह, मीराकुमार, अधीररंजन चौधरी, जयराम रमेश, सलमान खुर्शिद, राजीव सातव, रजनी पाटील, एच. के. पाटील यांच्यासह सर्व राज्यांचे प्रभारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress appoints general secretaries and in-charges of Committee