व्यसन सोडा नोकरी मिळवा- कॉंग्रेसचे आश्‍वासन

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

चंदिगड : जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केल्यास नोकरी देण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने पंजाबमधील युवकांना दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने ही नवी योजना जाहीर केली आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यास ती राबविण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. आतापर्यंत 12 लाख तरुणांनी या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत.

चंदिगड : जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केल्यास नोकरी देण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने पंजाबमधील युवकांना दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने ही नवी योजना जाहीर केली आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यास ती राबविण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. आतापर्यंत 12 लाख तरुणांनी या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत.

पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आपली पूर्ण ताकद लावणार आहे. पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "आप' सत्तेवर आल्यास 25 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. त्याला उत्तर म्हणून कॉंग्रेसने "व्यसन सोडल्यास नोकरी' ही अभिनव योजना सादर केली आहे. याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. 12 लाखांपैकी सर्वाधिक नोंदणी संगरूर येथे झाली आहे. हा भागात "आप'चे खासदार भगवंत मान यांचे प्राबल्य असून येथे 1.34 लाख तरुण या योजनेत सहभागी झाले आहेत. कॉंग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पतियाळा शहरातून 1.2 लाख, लुधियानात 1.2, जालंदरला 1.4 तर भटिंडातून 75 हजार 626 युवकांनी प्रतिज्ञानवरावर सह्या केल्या आहेत.

या योजनेसाठी कॉंग्रेसने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून 40 लाख युवक नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. पंजाबमधील तीन लाख कुटुंबे अशी आहेत जेथे एकाही सदस्याच्या हाताला काम नाही, असा दावा कॉंग्रेसने केला आहे. आम आदमी पक्षाने या योजनेवर यावर टिका केली आहे. अंमली पदार्थांचे सेवन न करण्याच्या अटीवर नोकरी देण्याचे हे आश्‍वासन हास्यास्पद आहे. याची पाहणी कॉंग्रेस कशी करणार आहे?, असा प्रश्‍न उपस्थित करून "आप'चे 25 लाख नोकऱ्या व रोजगाराची संधी हे आश्‍वासह साधे व सरळ आहे, असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.

बेरोजगारी भत्ता पत्र
'मी अंमली पदार्थांपासून दूर राहीन व माझ्या कुटुंबालाही अंमली पदार्थमुक्त करेन,' अशी प्रतिज्ञा पंजाबमधील युवक घेऊन त्यावर सही करीत आहे. यानंतर कॉंग्रेसकडून अशा युवकांना बेरोजगारी भत्ता पत्र दिले जात आहे. याद्वारे नोकरीची हमी किंवा नोकरी मिळेपर्यंत तीन वर्षे दर महिन्याला अडीच हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे.
 

Web Title: congress assures job for leaving addiction