PM मोदींच्या डोळ्यात राग कधी दिसणार? चीनने पुन्हा केलेल्या कुरापतीनंतर काँग्रेसचा सवाल

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 31 August 2020

पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात चीन विरोधातील राग कधी दिसणार, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली: पूर्व लडाख (Eastern Ladakh) सीमाभागात चीनी सैन्याने पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारने या वृत्ताला दुजोरा देखील दिलाय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्य आणि भारतीय लष्करी जवान यांच्यात झटापट झाली. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैन्याला भारतीय लष्कराने रोखल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात चीन विरोधातील राग कधी दिसणार, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. पुन्हा एकदा मध्यरात्री भारत-चीन सैन्यात झालेल्या झटापटीच्या घटनेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केले आहे. 

Galwan Valley Attack: गलवान खोऱ्यातील संघर्षात 80 चिनी सैनिक झाले होते? फोटो व्हायरल

भारताच्या हद्दीत घुसण्याचे आणखी एकदा प्रयत्न झाला. चीनकडून नेहमीच अशा प्रकारचे कृत्य सुरु आहे. पँगाँग परिसर, गोगरा आणि गलवान खोरे, डेपसंग प्लॅनस, लिपुलेख या भागात भारतीय लष्कर सक्षमपणे कर्तव्य बजावत आहे. पण मोदी चीन विरोधात कठोर पावले कधी उचलणार? त्यांच्या डोळे रागाने लाल कधी होणार? असा प्रश्न रणदिप सिंग सुरजेवाला यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थितीत केलाय.  

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट

पूर्व लडाख परिसरातील पँगाँग परिसरात भारत-चीन यांच्यातील सैन्यात पुन्हा एकदा आमना-सामना झाला. 29-30 ऑगस्ट मध्यरात्री दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यात झटापट झाली. भारतीय लष्कराने चीनला चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चीन सैन्याने भारतीय लष्कराला उसकवण्याचा प्रयत्न केला, असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेनंतर सीमारेषेवरील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी भारत-चीन यांच्यातील उच्च स्तरिय लष्करी अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. यापूर्वीही या मुद्यावरुन अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र दोन पावले मागे सरकत चीनकडून पुन्हा पुन्हा घुसखोरीच्या कुरापती घडताना दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress attacks on pm modi over India China LAC clashes