राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न! काँग्रेस अध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना पत्र; खर्गे म्हणाले, मी तुमचा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun Kharge Bharat Jodo Yatra

काँग्रेसनं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा केला होता.

राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न! काँग्रेस अध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना पत्र; खर्गे म्हणाले, मी तुमचा..

Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये त्याची सांगता होईल, त्यापूर्वी एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) भारत जोडो यात्रा सुरू असल्यापासून काँग्रेस राहुल गांधींच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्यानं उचलत आहे. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गृहमंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहिलंय.

पुढील दोन दिवस या यात्रेत मोठ्या संख्येनं लोक सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे, असं खर्गेंनी म्हटलंय. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक लोक सहभागी होणार आहेत. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत आपणास विनंती आहे की, या प्रकरणात आपण (Amit Shah) वैयक्तिक हस्तक्षेप करून पुरेशा सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. मी तुमचा ऋणी राहीन, असं खर्गेंनी पत्रात लिहिलंय.

दुसरीकडं, शुक्रवारी काँग्रेसनं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा केला होता. यावर ते म्हणाले, सुरक्षेच्या कारणास्तव मी दुर्दैवानं हे पत्र आपणास (अमित शाह) लिहित आहे. राहुल यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून यात्रा थांबवावी लागली. मात्र, यात्रेच्या समाप्तीपर्यंत ते संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करत राहतील या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विधानाचं त्यांनी स्वागत केलंय.