esakal | पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला कोरोना मंत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

modi with cm

दिल्लीने ज्या पद्धतीने महामारीवर लक्षणीय नियंत्रण मिळविले. राज्यांनीही हाच फॉर्म्युला अवश्‍य वापरावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला कोरोना मंत्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोविड-१९ चे संक्रमण झाल्यानंतर सुरवातीच्या ७२ तासांमध्ये रुग्णांची ओळख यंत्रणेने पटवली तर या महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर रोखता येतो. दिल्लीने याच पद्धतीने महामारीवर लक्षणीय नियंत्रण मिळविले. राज्यांनीही हाच फॉर्म्युला अवश्‍य वापरावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. बहुतांश मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळातील उध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्राकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून (एसडीआरएफ) आर्थिक पॅकेज मिळावे अशी जोरदार मागणी केली. 

कोरोना लढाईतील उपाययोजनांबबात मोदींनी महाराष्ट्रासह १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग्वारे चर्चा केली. पीएमओओतील अधिकारी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार व तेलंगण या १० राज्यांमध्ये कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळाले तर सारा देश ही लढाई जिंकेल असे सांगताना मोदींनी काही राज्यांनी चाचण्या वाढवाव्यात अशीही सूचना केली. संक्रमित रूग्णांची लवकरात लवकर ओळख पटविणे, सातत्याने देखरेख व कंटेनमेंट झोनमधील व्यवहार आवळणे हे कोरोनाविरूध्दचे प्रभावी हत्यार बनू शकते, हा आपल्याकडचा आतापावेतो आलेला अनुभव असल्याचे ते म्हणाले.

हे वाचा - पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक पॅकेज, राज्यातील सद्यस्थिती, धारावीसह मुंबईतील यशस्वी लढाई व्हेंटिलेटरची कमतरता, केंद्राकडून आरोग्यविषयक मदत आदी मुद्दे उपस्थित केले. 

केजरीवाल सरकारला चिमटा 
दिल्लीत काही महिन्यांपूर्वी कोरोनाबाबत वेगवेगळ्या आशंका घेतल्या जायच्या व राज्य सरकारनेही, मोठे संकट येणार (जुलैअखेर ५ लाख रूग्ण संख्या) असे सांगण्यात येत होते, असा चिमटा मोदींनी केजरीवाल सरकारला काढला. ते म्हणाले, की लोकांमध्ये घबराट निर्माण झाल्यावर केंद्राने गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र-राज्याची एक टीम बनविली व नव्या दृष्टीकोनातून कोरोना लढाई सुरू केली. त्याचे चांगले परिणाम सारा देश पहातो आहे. हाच कित्ता इतर राज्यांनी गिरवला तर देशात कोरोनाचा पराभव होण्यास वेळ लागणार नाही. कितीही वाईट परिस्थिती असली तरी योजनाबद्ध पावले टाकली तर १० आठवड्यांत परिस्थिती आपल्याला अनुकूल करता येते.

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस भारताला मिळणार का?

दररोज सात लाख चाचण्या 
मोदी म्हणाले, की कोरोना लढाईत देश योग्य मार्गाने अग्रेसर आहे. देशात सध्या दररोज ७ लाख चाचण्या होत आहेत. मात्र बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल व तेलंगणा या राज्यांनी चाचण्यांची संख्या आणखी वेगाने वाढविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रुग्णांची लवकर ओळख पटवून उपचार त्वरित सुरू करणे, जनजागृती या उपायांचा जास्तीत जास्त वापर करून या १० राज्यांना महामारीवर नियंत्रण मिळविणे शक्‍यही आहे. राज्यांना केंद्र सर्वतोपरी मदत करण्यास कायम तयार व सज्ज आहे. चाचण्यांची संख्या वाढत जाईल. देशात सक्रिय रुग्णसंख्या व मृत्यूदर झपाट्याने कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे हे अतिशय चांगले लक्षण आहे. 

loading image
go to top