काँग्रेसला रामराम, गोवा फॉरवर्डला सलाम 

विलास महाडिक 
गुरुवार, 24 मे 2018

मतदारसंघात कामे करण्यास काँग्रेसकडून न मिळणाऱ्या सहकार्यामुळे तसेच गोमंतकियांना न्याय देण्यासाठी गोव्याची अस्मिता जपणाऱ्या गोवा फॉरवर्डमध्ये कामे करण्यास मदत होईल यामुळे आज प्रवेश केल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. 

गोवा - मये मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संतोष सावंत यांनी काँग्रेसला रामराम ठेकून गोवा फॉरवर्डला सलाम करत गोवा फॉरवर्डमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. मतदारसंघात कामे करण्यास काँग्रेसकडून न मिळणाऱ्या सहकार्यामुळे तसेच गोमंतकियांना न्याय देण्यासाठी गोव्याची अस्मिता जपणाऱ्या गोवा फॉरवर्डमध्ये कामे करण्यास मदत होईल यामुळे आज प्रवेश केल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. 

खाणप्रश्नी अध्यादेश काढा - सरदेसाई  
नगरनियोजनमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संतोष सावंत यांना पक्षाची निशाणी असलेले श्रीफळ देऊन स्वागत केले. मये हा मतदारसंघ खाणक्षेत्र असलेला आहे व सध्या खाणकाम बंद आहे. त्यामुळे भाजप सरकारने खाणी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यास प्रयत्न न केल्यास ही निवडणूक कठीण जाणार आहे. सध्या गोवा फॉरवर्ड सरकारमध्ये असल्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा विचार नाही मात्र खाण प्रश्न सुटल्यास पक्षाला फेरविचार करावा लागेल असे संकेत सरदेसाई यांनी दिले. राज्यातील खाण कामगार व अवलंबित बेरोजगार झाले आहेत त्यामुळे हा प्रश्न राज्य व केंद्रात भाजप असल्याने अध्यादेश काढून सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. 

काँग्रेसने सरकार करून दाखवावेच - सरदेसाई
दरम्यान, कर्नाटकमधील सरकार स्थापनेचा फॉर्म्युला गोव्यातही लागू करण्यासाठी येथील काँग्रेस पक्ष अधिक कार्यरत झाला आहे. काँग्रेस पक्ष मगोला हाताशी धरून सरकार स्थापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी हे प्रयत्न सफल करून दाखवावे असे आव्हान मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले. गोवा फॉरवर्ड पक्ष हे सरकार कोणत्याच प्रकारे हे होऊ देणार नाही असे ठामपणे ते म्हणाले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Congress candidate has entered Goa forward party