'राहुल गांधी तसं काही म्हणालेच नाहीत'; काँग्रेसने केला खुलासा

सूरज यादव
Wednesday, 15 July 2020

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या बैठकीत राजस्थानच्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्वेगाने बोलल्याची चर्चा सुरू होती. 

नवी दिल्ली - राजस्थानात सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर आणि काँग्रेसने केलेल्या हकालपट्टीनंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर आता ते काय कऱणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी सचिन पायलट यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, मी भाजपमध्ये जाणार नाही. त्यामुळे ते परत यावेत यासाठी अजुनही काँग्रेस प्रयत्न करत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या बैठकीत राजस्थानच्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्वेगाने काही उद्गार काढल्याची चर्चा सुरू होती. 

कोणाला पक्ष सोडायचा असेल ते सोडतील. यामुळे तुमच्यासारख्या तरुण नेत्यांसाठी दरवाजे उघडतील असं राहुल गांधी यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयने ट्विटवर दिलं होतं. त्यानंतर इतर माध्यमांनीही असं वृत्त दिलं होतं. त्यानंतर हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत राहुल गांधी असं काही बोलले नसल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. रणदीप सुरजेवाला हे अजुनही पायलट यांची मनधरणी करावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.

राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना रोखण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राजस्थानातील राजकीय उलथापालथ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये जयपूरला पाठवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये रणदीप सुरजेवाला हेसुद्धा होते. त्यांनी म्हटलं होतं की, गेल्या आठवड्याभरात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते पायलट यांना पुन्हा पक्षात परत येण्यासाठी संपर्क करत होते. सर्वांकडून फक्त त्यांना इतकंच सांगितलं जात होतं की, तुम्ही पुन्हा येऊन एकदा तुमची बाजू मांडा. यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणुगोपालराव यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचा - राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू

काँग्रेसने इतके प्रयत्न केल्यानंतरही पायलट यांचे मन वळवण्यात यश आलं नाही. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांचे म्हणणेसुद्धा सचिन पायलट यांनी ऐकले नाही. वरिष्ठ नेत्यांनी इतक्या वेळा संपर्क केल्यानंतरही पायलट यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तेव्हा अखेर काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली. पायलट यांची उप मुख्यमंत्रीपदावरून तसंच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress clarify rahul not said If anybody wants to leave the party they will