esakal | राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gehlot rajsthan

गेहलोत यांना राजकाराणातील जादूगार म्हटलं जातं. मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात जादूचे खेळही करून दाखवले आहेत.

राजस्थानच्या रस्त्यावर जादू दाखवणाऱ्या गेहलोतांनी सत्तासंघर्षातही दाखवली जादू

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्या बंडानंतरही राज्यात सरकार स्थिर ठेवण्याची जादू दाखवली आहे. राज्यात सरकार स्थिर ठेवायचं असेल तर 101 चे संख्याबळ असणं आवश्यक आहे. गेहलोत यांनी त्यांच्या घरी बोलावलेल्या बैठकीला त्यांच्या 107 आमदारांपैकी 102 आमदारांनी हजेरी लावली होती. गेहलोत यांना राजकाराणातील जादूगार म्हटलं जातं. मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात जादूचे खेळही करून दाखवले आहेत. त्यांचे वडील जादूगार होते. 

डिसेंबर 2018 मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. सचिन पायलट यांना उप मुख्यमंत्रीपद दिलं होतं. यामुळे पायलट नाराज होते. दोघांमध्ये अधून मधून वादाच्या बातम्याही येत होत्या. अखेर सचिन पायलट यांनी उघडपणे बंडाचं निशाण फडकावलं. तेव्हा त्यांनी थेट असंही म्हटलं की गेहलोत यांचे सरकार अल्पमतात आहे. मात्र दुसऱ्या बाजुला राजकारणातल्या या जादुगाराने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 

हे वाचा - गेहलोत यांच्या राज्यात 'कमल'नाथ पॅटर्न अवघडच

याआधी 2008 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी कमाल केली होती. काँग्रेसला 200 पैकी 96 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा बसपाच्या 6 आमदारांना मायावती यांच्या परवानगीशिवाय त्यांनी आपल्या बाजुने वऴवलं होतं. याविरोधात पक्षानं आमदारांना अपात्र ठरवण्याचं अपील केलं होतं. दरम्यान, या जोरावर त्यांनी पाच वर्षे सरकार चालवलं होतं. सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर आमदारांबाबतचा निर्णय गेहलोत यांच्या विरुद्ध लागला होता पण तोपर्यंत त्यांची पाच वर्षे पूर्ण झाली होती. 

गेहलोत यांचा जन्म 3 मे 1951 ला जोधपूरमध्ये झाला. त्यांचे वडील लक्ष्मण सिंग गेहलोत हे जादूगार होते. वडीलांकडून हातचलाखीचे खेळ अशोक गेहलोत यांनीही घेतले मात्र यात त्यांचे मन रमले नाही. कॉलेजमद्ये असताना त्यांनी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचं काम केलं. 1973 ते 1979 मध्ये ते राजस्थान NSUI चे अध्यक्ष होते तर त्यानतंर 1982 पर्यंत जोधपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. 

हे वाचा - कमी वयात तुम्हाला खूप काही दिलं; काँग्रेसकडून पायलट यांच्यावरील उपकारांचा पाढा

अर्थशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या गेहलोत यांनी वयाच्या 26 व्या वर्षी सरदारपुरा इथून निवडणूकीसाठी काँग्रेसकडे तिकिट मागितलं होतं. तेव्हा संजय गांधी यांच्यामुळे गेहलोत यांना उमेदवारी मिळाली. निवडणुकीसाठी त्यांनी गाडी विकली आणि त्यातून खर्च केला. मित्राच्या सलून दुकानात निवडणुकीसाठी कार्यालय थाटलं. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. मात्र त्यानंतर त्यांनी थेट लोकसभेत बाजी मारली. 

1980 मध्ये जोधपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यानंतर राजकारणात गेहलोत यांनी प्रत्येक संकटावर मात केली.  1980 ला लोकसभा जिंकल्यानंतर ते सलग पाचवेळा खासदार झाले. त्यानंतर 1999 ला पहिल्यांदा राजस्थानमध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांनी गांधीवादी सुब्बाराव शिबिरांमध्ये सेवा बजावली होती.  

हे वाचा - सचिन पायलट यांच्या बंडखोरीला आहे 'वारसा'; वडिलांनीही उचलला होता बंडाचा झेंडा

गांधीवादी नेता असलेल्या गेहलोत यांची विरोधकांना शह देण्यासाठीही  वेगळी ओळख आहे. विरोधकांची प्रत्येक गोष्ट ते लक्षात ठेवतात. कधीच उघडपणे बोलणं टाळतात मात्र जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा काम साधतात. साधेपणाने आणि जनसामान्यांत वावरणारे अशोक गेहलोत एखादा कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटत नाहीत. आसाराम बापू प्रकरण असो किंवा विहिप नेते प्रवीण तोगडिया यांची अटक असो.

अशोक गेहलोत काँग्रेसच्या तीन वेगवेगळ्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद सांभाळले होते. नरसिंह राव यांच्या सरकारमधून त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. आतापर्यंतच्या प्रवासात काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या गेहलोत गांधी कुटुंबातील तिसऱ्या पीढीसोबत राजकारणात सक्रीय आहेत.
 

loading image