जीएसटीच्या निर्णयावेळी काँग्रेसही आमच्या बरोबरीने: मोदी

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

"जीएसटी'बाबत ते म्हणाले, "जीएसटीची अंमलबजावणी सुरवातीला प्रयोग म्हणून सुरू केली. तीन महिन्यांनी त्याचा फेरआढावा घेत त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. जीएसटी बाबातचे सर्व निर्णय सर्व राज्ये मिळून घेतात. आम्ही एकटे त्याबाबत निर्णय घेत नाही. जीएसटीचा निर्णय घेण्यात काँग्रेसही आमच्या बरोबरीने होते.''

गांधीनगर : "कॉंग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचे धाडस करून दाखवावे,'' असे थेट आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत मोदी यांनी एकप्रकारे गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 

गुजरात गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी त्यांची आज प्रचंड जाहीर सभा झाली. या वेळी मोदी यांनी अधिक आक्रमकपणे कॉंग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, "नेहरू-गांधी कुटुंबाला गुजरात व गुजराती लोक आवडत नाहीत. सकारात्मक विचार करण्याची क्षमता कॉंग्रेसने गमावली असल्याने आज त्यांची ही हालत झाली आहे. विकासाच्या मुद्यावर कॉंग्रेसचा नेहमी नकारात्मक सूर असतो. त्यामुळे ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कॉंग्रेसने आगामी निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढूनच दाखवावी.'' 

ते म्हणाले, "गुजरातमध्ये आगामी निवडणुकीत विकासाचा विजय होईल आणि घराणेशाहीचा पराभव होईल. "यूपीए'च्या राजवटीत विकास झालाच नाही. त्यांनी आमच्यासाठी बारा लाख कोटींची कामे अपूर्ण सोडली. एकोणीस मोठे धरण प्रकल्प अपूर्ण ठेवले. त्यांची ही अपूर्ण कामे करण्याची वेळ आता आमच्या "एनडीए' सरकारवर आली आहे. ती कामे आम्ही आता पूर्ण करत आहोत. नर्मदेचे पाणी आम्ही साऱ्या राज्यात पोचविले.'' 

काळ्या पैशांबाबत बोलताना मोदी म्हणाले, "आमच्या सरकारने दोन लाख दहा हजार बोगस कंपन्या बंद केल्या. त्याला कोणीही विरोध केला नाही. तीन लाख कोटींचा काळा पैसा शोधून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या एक नोव्हेंबरला आम्ही देशात काळा पैसामुक्ती दिन पाळणार आहोत.'' 

"जीएसटी'बाबत ते म्हणाले, "जीएसटीची अंमलबजावणी सुरवातीला प्रयोग म्हणून सुरू केली. तीन महिन्यांनी त्याचा फेरआढावा घेत त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. जीएसटी बाबातचे सर्व निर्णय सर्व राज्ये मिळून घेतात. आम्ही एकटे त्याबाबत निर्णय घेत नाही. जीएसटीचा निर्णय घेण्यात काँग्रेसही आमच्या बरोबरीने होते.''

Web Title: Congress 'an equal partner' in GST decision: PM Modi