Dynasty in BJP: हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची घराणेशाही; दोष मात्र एकट्या काँग्रेसला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dynasty in BJP

Dynasty in BJP: हिमाचलमध्ये भाजपची घराणेशाही; 'एवढे' उमेदवार आहेत बलाढ्य नेत्यांचे वारस

Himachal Pradesh and Gujarat Assembly Elections 2022 : सध्या देशभरात भाजपचा वारु ज्या वेगात उधळतोय, त्याला रोखणे इतर पक्षांना किती शक्य होईल, हे सांगणे अवघडच आहे. परंतु काँग्रेसला ज्या मुद्द्यांवर भाजपने कायम टार्गेट केले, त्या मुद्द्यांशी आता भाजप तडजोड करतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण आहे हिमाचल प्रदेश निवडणूक. या निवडणुकीत भाजपने घराणेशाहीला बऱ्यापैकी गोंजारल्याचं चित्र आहे.

Himachal Pradesh Elections Nepotism in BJP

सध्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुका लागलेल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर ८ डिसेंबरला निकाल हाती येतील. आजघडीला तरी तिथे भाजप बाजी मारेल, अशी परिस्थिती आहे. त्यातही हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी मिळत नाही, हाही इतिहास आहे. मुद्दा आहे घराणेशाहीचा. घराणेशाहीच्या कायम विरोधात बोलणाऱ्या भाजपने आठ ते नऊ ठिकाणी बलाढ्या नेत्यांच्या वारसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत.

हेही वाचा: Himachal Pradesh Election: 'आप'चं लक्ष्य गुजरात; हिमाचलमध्ये भाजप की काँग्रेस?

'या' नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवाऱ्या...

  • १. जयराम ठाकूर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि ज्येष्ठ नेते महेंद्रसिंग ठाकूर यांचा मुलगा रजत ठाकूर यांना भाजपने धरमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. महेंद्रसिंग हे मंडी जिल्ह्यातल्या धरमपूरमधून सहा वेळा विधानसभेत गेले आहेत. विशेष म्हणजे पाच वेगवेगळ्या पक्षातून त्यांनी निवडणुका लढवल्या.

  • २. ईश्वरदास धीमान हे हिमाचल प्रदेशचे माजी शिक्षणमंत्री (१९९८-२००३) होते. त्यांचे चिरंजीव अनिल धीमान यांना भाजपने तिकीट दिलं आहे. मागच्या वेळी मात्र धीमान यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली होती. त्यांच्याऐवजी पक्षाने कमलेश कुमारी यांना तिकीट दिलं होतं.

  • ३. माजी मंत्री कुंजलाल ठाकूर यांचे पुत्र तथा मावळत्या सरकारमधील मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनाही भाजपने उमेदवारी दिली. मनालीमधून ते निवडणूक लढवित आहेत.

  • ४. माजी दूरसंचार मंत्री सुख राम यांचा मुलगादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपने मंडी सदर मतदारसंघातून सुख राम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आश्रय शर्माने २०१९मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. या प्रकारामुळे अनिल शर्मा यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. मात्र आता भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

  • ५. जुब्बल कोटखई या मतदारसंघातून भाजपने चेतन ब्रागटा यांना उमेदवारी दिली आहे. चेतन हे ज्येष्ठ नेते स्व. नरेंद्र ब्रागटा यांचे चिरंजीव आहेत. २०२१मध्ये नरेंद्र ब्रागटा यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

  • ६. भाजपने चांबा मतदारसंघातून विद्यमान आमदार पवन नय्यर यांच्या पत्नी नीलम नय्यर यांना उमेदवारी दिली.

  • ७. माजी आमदार बलदेव शर्मा यांच्या पत्नी माया शर्मा यांना भाजपने उमेदवारी दिली. बारसमधून त्या नशीब आजमावत आहेत.

  • ८. साधारण ९ वर्षे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले प्रेमकुमार धुमल हे आता वयोवृद्ध झालेले आहेत. त्यामळे भाजपने त्यांना तिकीट नाकारले आहे. परंतु त्यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर हे केंद्रीय मंत्री आहेत. शिवाय ते पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते असल्याने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

हेही वाचा: Himachal Pradesh Election: येथील लोक एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता देत नाहीत, यावेळी मात्र...

काँग्रेसमधली घराणेशाही

काँग्रेसमध्ये तर मोठमोठी राजकीय घराणे आहेतच. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांना शिमला ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलेले आहे. शिवाय वीरभद्रसिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग यांचाच चेहरा पुढे करुन काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह माजी मुख्यमंत्री ठाकूर राम लाल यांचे नातू रोहित ठाकूरही जुब्बल कोटखईमधून रिंगणात आहेत. माजी मंत्री सत महाजन यांचे पुत्र अजय महाजन यांना काँग्रेसने नूरपूर विधानसभा मतदारसंघतातून उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री पंडित संत राम यांचे चिरंजीव तथा नगरविकास मंत्री सुधीर शर्मा हे धर्मशाळा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

हेही वाचा: HP Election: जेपी नड्डा यांची ही कर्मभूमी; या मुद्द्यांमुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप...

अशी घराणेशाही जोपासण्याचं काम काँग्रेससह भाजप करत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीवर विशेष लक्ष दिल्याचं दिसून येतय. त्यामुळे सध्या तरी 'आप'ने म्हणावा तसा रस हिमाचल प्रदेशमध्ये दाखवलेला नाही.

भ्रष्टाचार आणि घराणेशाही यामध्ये ग्रासून गेल्याने काँग्रेसला २०१४नंतर उतरती कळा लागली. नरेंद्र मोदी देशासाठी मोठं स्वप्न घेऊन आले होते. ''अच्छे दिन'' म्हणत त्यांनी भारतीयांना बऱ्यापैकी भूरळ घातली होती. भाजपने भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला तिलांजली देण्याचं वचन दिलेलं. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. भाजपदेखील घराणेशाहीच्या शेपटीला धरुन निवडणुकांच्या रिंगणात उतरत असल्याचं दिसून येत चित्र आहे.