हा तर 'हाऊडी मोदी'चा परिणाम; ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन सिब्बल यांचा मोदींना टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेंशियस डिबेटदरम्यान भारताबाबत टिप्पणी केली होती.

नवी दिल्ली- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेंशियस डिबेटदरम्यान भारताबाबत टिप्पणी केली होती. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.  ट्रम्प यांनी आपल्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना भारताची हवा सर्वाधिक दुषित 'FilthyAir' असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ट्विटरवर #HowdyModiहॅशटॅश ट्रेंडमध्ये आला आहे. अनेकांनी या हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरुन मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मागील वर्षी टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये ट्रम्प यांच्यासोबत एक रॅली केली होती. या रॅलीला "#HowdyModi" नाव देण्यात आले होते. 

'धार्मिक तेढ निर्माण करणा-या प्रकाश झा यांना अटक करा'

लोकांनी दिली प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यामध्ये मैत्री असल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशात एकमेकांच्या सभा आयोजित केल्या आहेत. एका सभेत दोन्ही नेते एकमेकांचा हात पकडून चालत असल्याचे दिसून आले होते. या मुद्द्याचा आधार घेत अनेक नेटकऱ्यांनी मोदींवर टीका करणे सुरु केले आहे. मोदींच्या मैत्रीचे हेच फळ आहे का, असा सवाल काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. दुसरीकडे, काहींनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा स्वीकार केला आहे. अनेकांनी दिल्लीतील प्रदुषित हवेचा दाखला दिला आहे. दिल्लीचा सध्या एअर क्वालिटी इंडेक्स 567 आहे, तर वॉशिग्टनमध्ये हा केवळ 25 आहे. 

कपिल सिब्बल यांनी केली टीका

ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षांनी मोदींना लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या हवेला खराब म्हणणे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचा परिणाम आहे. ट्रम्प यांच्या मित्रतेचा काय फायदा झाला, एक- भारतातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित करणे, दोन- भारताची हवा खराब असल्याचं म्हटले, तीन- भारताला टेरिफ किंग म्हटले. हे सर्व हाऊडी मोदीचा परिणाम आहे. कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी केलेल्या अमेरिकीच्या दौऱ्याचे चांगले परिणाम आले आहेत. पंतप्रधान मोदी दोन्ही देशातील घनिष्ठ मैत्रीचा दावा करतात. पण, ट्रम्प थेटपण भारतावर टीका करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress kapil sibbal criticize narendra modi on donald trump comment HowdyModi