PM मोदींनी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' अशी घोषणा द्यावी, काँग्रेस नेत्याचा टोला

सकाळ ऑनलाईन
Monday, 5 October 2020

तुम्हाला काय झालं मोदीजी ? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ? हाथरसनंतर ढोंगीपणा उघड झाला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' ऐवजी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' ही घोषणा दिली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. मोदींचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

पंतप्रधान लोकल ते ग्लोबलपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर बोलतात. मग ते उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील युवतीच्या हत्या आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेवर चूप का आहेत, असा प्रश्न चौधरी यांनी केला.

हेही वाचा- सुशांत आत्महत्याः एम्सच्या अहवालानंतर भाजप आता फॉरेन्सिक टीमवरही आरोप करेल, काँग्रेस नेत्याचा टोला

चौधरी यांनी टि्वट करत म्हटले की, मोदीजी लोकल ते ग्लोबल सर्व मुद्द्यांवर बोलतात. परंतु, हाथरसमधील हृदयद्रावक घटनेवर मात्र ते गप्प बसतात. तुम्हाला काय झालं मोदीजी ? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ? हाथरसनंतर ढोंगीपणा उघड झाला आहे. मोदीजी तुम्ही चुप रहो भारत, शांत रहो भारत ही नवी घोषणा द्यावी.

दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर एम्सने शिक्कामोर्तब केल्यानंतरही भाजपवर निशाणा साधला होता. भाजपची प्रचार यंत्रणा एम्सच्या न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकावरही याबाबत आरोप करु शकते, असा टोला त्यांनी लगावला होता. 

हेही वाचा- 'CBI, ईडीचं माझ्या मुलावर प्रेम'; काँग्रेस नेत्याच्या आईची उपरोधिक टीका

भाजपच्या प्रचार यंत्रणेने सुशांतसिंहच्या हत्येचा कट रिया चक्रवर्तीने  रचल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या मृत्यूचे दुःख आम्हालाही आहे. परंतु, एका महिलेला आरोपी ठरवून त्याचा खोटा सन्मान केला जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Adhir Ranjan chowdhury slams on pm modi over Hathras incident