कोण जेपी नड्डा? मी कशाला उत्तर देऊ? - राहुल गांधी

टीम ई सकाळ
Tuesday, 19 January 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावरही जोरदार टीका केली.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावरही जोरदार टीका केली. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, कृषी क्षेत्रावर तीन ते चार धनदांडग्यांचे वर्चस्व निर्माण होईल असा हा कायदा आहे. शेती पुन्हा स्वातंत्र्याच्या आधी जशी होती तशीच होईल असं म्हणत कायद्याविरोधात आम्ही आवाज उठवू असं राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा राहु गांधी म्हणाले की, नड्डी कोणी भारतीय प्राध्यापक आहेत का ज्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर द्यावं. मी भारतातील लोक आणि शेतकऱ्यांना उत्तर देईन. भट्टा परसौलच्या घटनेवेळी नड्डा कुठं होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला तेव्हा काँग्रेस होती. जमीन अधिग्रहण कायदा काँग्रेसनं आणला असंही ते म्हणाले. तसंच कोण आहेत जेपी नड्डा असाही प्रश्न त्यांनी विचारला. 

तिनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करताना राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मी देशभक्त आणि स्वच्छ चारित्र्याचे व्यक्ती आहे. देशाच्या संरक्षणासाठी नेहमीच आवाज उठवत राहीन. मी नरेंद्र मोदी किंवा इतर कोणाला घाबरत नाही. कोणी मला हात लावू शकत नाही. मला गोळी मारू शकतात. मी देशभक्त आहे आणि देशाची सुरक्षा करतो आणि करत राहीन. सगळा देश जरी एका बाजूला असला तरी मी एकटा उभा राहीन. मला फरक पडणार नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं. 

हे वाचा - अर्णब चॅट प्रकरणावरून राहुल गांधी पहिल्यांदा बोलले

दरम्यान, राहुल गांधींनी जेपी नड्डांना टार्गेट केल्यानंतर छत्तीसगढ काँग्रेसनं सोशल मीडियावर काही फटोज शेअर केले आहेत. यामध्ये गाडीच्या काचेवर ये नड्डा कौन है? असं स्टीकर लावल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. याशिवाय भिंतीवरसुद्धा असे कागदी पोस्टर लावल्याचे फोटो छत्तीसगढ काँग्रेसनं ट्विटरवरून शेअर केले आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader ask who is jp nadda in press conference delhi