'जे शत्रूला जमलं नाही ते मोदी करतायत'

सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 23 December 2019

नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्‌द्‌यावर मुस्लिम संघटना आणि सामाजिक संघटनांच्या आक्रमक आंदोलनांनंतर कॉंग्रेसने आज राजघाट या महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सत्याग्रह करून नागरिकत्व कायद्यावर संघर्षाचा संकल्प संकल्प जाहीर केला.

नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्‌द्‌यावर मुस्लिम संघटना आणि सामाजिक संघटनांच्या आक्रमक आंदोलनांनंतर कॉंग्रेसने आज राजघाट या महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सत्याग्रह करून नागरिकत्व कायद्यावर संघर्षाचा संकल्प संकल्प जाहीर केला. देशाची प्रगती रोखण्याचे शत्रूंना न जमलेले काम आता मोदी करत आहेत, अशी तोफ राहुल गांधींनी या वेळी डागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सत्याग्रह पुढे ढकलला
सरकारला संदेश देणारे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी कॉंग्रेसने जाणीवपूर्वक महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटाची निवड केली होती. काल हा सत्याग्रह होणार असल्याचे कॉंग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, रामलिला मैदानावरील मोदींच्या सभेमुळे कॉंग्रेसला सत्याग्रहाचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह कॉंग्रेस शासीत राज्यांचे मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत तसेच अहमद पटेल, ए. के. ऍन्टनी, गुलाम नबी आझाद, के. सी. वेणुगोपाल आदी नेते आणि कार्यकर्त्यांनी कडाक्‍याच्या थंडीत सायंकाळी सहा ते आठ असा सत्याग्रह केला. या वेळी सोनिया, राहुल, प्रियांका तसेच डॉ. मनमोहनसिंग यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून नागरिकत्व कायद्याविरोधातील लढाई आता रस्त्यावर लढण्याचा संदेश दिला. तसेच हे विधेयक घटनाविरोधी असल्याचाही हल्ला चढवला. 

झारखंडमध्येही पराभव; काय चुकलं भाजपचं?

'हा भारत मातेचा आवाज'
राहुल गांधींनी सुधारीत नागरिकत्व कायद्याला लक्ष्य करताना मोदींवर आक्रमक शब्दात हल्ला चढवला. राहुल म्हणाले, 'राज्यघटनेची प्रस्तावना ही इंग्रजाना पळवून लावणाऱ्या जनतेचा आवाज आहे. या आवाजाशिवाय हिंदुस्थान राहणार नाही. देशाच्या शत्रूंनी हा आवाज दाबण्याचा, प्रगती रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र जे काम देशाचे शत्रू करू शकले नाही. ते काम नरेंद्र मोदी जीव तोडून करत आहेत. मोदी न्यायपालिकेवर दबाव आणतात, विद्यार्थ्यांवर लाठीमार होतो, प्रसारमाध्यमांना दडपतात तेव्हा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मोदी कॉंग्रेस पक्षाशी नव्हे तर या देशाच्या आवाजाविरुद्ध लढत आहात. मोदी आणि त्यांचे मित्र अमित शाह यांनी लक्षात घ्यावे की, हा आवाज कॉंग्रेस पक्षाचा नव्हे तर, भारत मातेचा आवाज आहे.' दंगेखोर कपड्यांवरून ओळखता येतात या मोदींच्या वक्तव्याचाही राहुल गांधींनी समाचार घेतला. मोदींनीच दोन कोटी रुपयांचा सूट परिधान केला होता. बेरोजगारी, बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर उत्तर देऊ शकत नसल्यामुळे मोदी विभाजनवादी राजकारण करत आहेत. देशात विद्वेष पसरविण्यात मोदी नंबर वन असल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader rahul gandhi statement against pm modi over caa and nrc