राहुल गांधी बहिणीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय; नेत्यांमध्ये रस्सीखेच!

टीम ई-सकाळ
Sunday, 16 February 2020

ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा, महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. 

नवी दिल्ली : मर्यादित जागांच्या संधीमुळे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झाली असून, प्रियांका गांधींना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पक्षातून पुढे आल्याचे समजते. कॉंग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाली असून, राहुल गांधी यांचा निर्णय उमेदवारी देण्यात महत्त्वाचा असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रियांका गांधी वद्रा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याखेरीज ज्येष्ठ नेते मोतिलाल व्होरा, महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, राजस्थानचे प्रभारी असलेले अविनाश पांडे, मुकुल वासनिक, राजीव शुक्लाव, मीराकुमार, बी. के. हरिप्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे हे इच्छुक आहेत, तर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी मावळते खासदार हुसेन दलवाई यांचाही पुन्हा खासदारकीसाठी प्रयत्न सुरू आहे.

आणखी वाचा - जामियाँ प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

शरद पवारांची जागाही होणार रिक्त 
एकूण 245 संख्याबळ असलेल्या राज्यसभेमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे 82 खासदार आहेत; तर कॉँग्रेसची खासदार संख्या 46 एवढी आहे. निवृत्त होणाऱ्या 55 खासदारांमधील 14 जण भाजपचे, तर 11 जण कॉँग्रेसचे आहेत. त्या व्यतिरिक्त एआयएडीएमके आणि तृणमूल काँग्रेसचे प्रत्येकी चार तसेच संयुक्त जनता दलाचे तीन खासदार आहेत. यामध्ये राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, दिग्विजयसिंह, मधुसूदन मिस्त्री, पी. एल. पुनिया, समाजवादी पक्षाचे नेते प्रा. रामगोपाल यादव, लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रेमचंद गुप्ता, रिपब्लिकन पक्षाचे नेते परंतु, राज्यसभेत भाजपचे खासदार असलेले रामदास आठवले या चेहऱ्यांचा समावेश आहे. 

आणखी वाचा - दिल्लीनंतर 'या' ठिकाणी भाजपचा मार्ग खडतर!

महाराष्ट्रातून भाजपला दोनच जागा?
महाराष्ट्रातून हुसेन दलवाई, राजकुमार धूत, ॲड. माजिद मेमन तसेच संजय काकडे, अमर साबळे हे देखील निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातील सातपैकी दोन जागा भाजपला जिंकण्याची संधी आहे. यातील एक जागा रामदास आठवलेंसाठी सोडण्याची भाजपची तयारी असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेसाठी संधी आहे. संजय काकडेंच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून निवडणूक लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leaders demand for priyanka gandhi in rajya sabha rahul gandhi to decide