Video : जामिया मारहाण प्रकरण; आत्तापर्यंतचा सर्वात अधिक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Sunday, 16 February 2020

विद्यापीठातल्या अभ्यासिकेतला हा व्हिडीओ आहे. सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसत आहे. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय.

दिल्ली : दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामीया इथं विद्यार्थ्यांनी सीएए व एनआरसी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे देशभर वातावरण तापलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. बसेस जाळण्यात आल्या होत्या आणि तोडफोडही झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

आंदोलनादरम्यान झालेली हिंसा यामुळे हे प्रकरण देशभर गाजलं होतं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. दावे-प्रतिदावे केले गेले. या प्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, आत्तापर्यंतचा हा सर्वात धक्कादायक  व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.

विद्यापीठातल्या अभ्यासिकेतला हा व्हिडीओ आहे. सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसत आहे. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय. पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे आम्हाला मारहाण केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता हा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा वादाची शक्यता व्यक्त केली जातेय.

काय झालं होतं जामियात? नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून 15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन झाले होते. त्यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. याचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. सीसीटीव्हीमध्ये एक आंदोलक बाइकला आग लावतो त्यानंतर बस पेटवण्यासाठी आग लावलेली बाइक त्याखाली ढकलून देतो.

दिल्ली पोलिसांनी जामियाजवळ झालेल्या हिंसाचारातील तीन सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केली आहेत. यामधील पहिल्या व्हिडिओत काही लोक एका बाइकला आग लावताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आग लावण्यासाठी काही आंदोलक बाइकमधून पेट्रोल काढताना दिसतात. तर शेवटच्या व्हिडिओत बस जाळत असलेलं दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ 15 डिसेंबरचा असल्याचं म्हटलं आहे. यावरून आंदोलनावेळी हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवणे शक्य होईल असंही पोलिसांनी म्हटलं होतं.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिस क्रुरपणे मारत असताना आतातरी कारवाई करावी आणि कारवाई केली नाही तर सरकारचा हेतू चांगला नव्हता हेच सिद्ध होतं असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jamiya miliya islamiya police beeten students caa nrc protest new delhi