मोदी सरकारविरोधात करिना कपूर रिंगणात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे.

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे. करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ काँग्रेसने केली आहे.

गेली 40 वर्षे काँग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे. करिना कपूर-खान भोपाळची निवडणूक जिंकू शकते. भोपाळ करिनाचे सासर आहे आणि करिना पती सैफ अली खानसोबत नेहमीच भोपाळमध्ये जात असते. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी करिनाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून उभे करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते गुड्डू चौहान, अमित शर्मा आणि मोनू सक्‍सेना यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचवली आहे.

मध्य प्रदेशात महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. याच यशाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचे असल्यास करिना कपूर यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. करिना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यानं भोपाळ मतदारसंघ जिंकणं सोपं होईल, असे राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडले आहे.

दरम्यान, करिना कपूर पतौडी घराण्याची सून असल्याने त्याचा फायदा तिला जुन्या भोपाळमध्ये होईल. याशिवाय महिला वर्गदेखील मोठ्या प्रमाणात करिनाला मतदान करेल, असा विश्वास नगरसेवक अनीस खान यांनी व्यक्त केला. करिनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येत असतात. याचा फायदा करिनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटत आहे. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची लवकरच भेट घेणार आहेत.

Web Title: congress leaders want kareena kapoor contest polls bhopal lok sabha seat