50 वर्षे विरोधी बाकावर बसावे लागेल म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला राहुल गांधींनी केला फोन

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 29 August 2020

पक्षाच्या अध्यक्षपदासाठी लवकरात लवकर निवडणूक घेतल्या जातील. याशिवाय पक्षांतर्गत अन्य निवडणुकाही पार पडतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केलाय.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही गांधी घराण्याशिवाय अन्य कोणाकडे द्यावी, अशी चर्चा रंगत असताना सोनिया गांधी याच हंगामी अध्यक्षपदावर कायम राहतील, यावर शिक्कामोर्तब झाला. यावर काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाही तर पक्षाला पुढील 50 वर्षे विरोधी बाकावरच बसावे लागेल, असे वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले. गांधी कुटुंबियांशी कोणतीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

कोरोना लशीच्या जोडीला राष्ट्रवाद

याप्रकरणानंतर काँग्रेस पक्ष अंतर्गत एकजूट नसल्याचे समोर आले होते. वरिष्ठांमधील नाराजी दूर करण्यासाठी आता राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे. कार्यकारणीच्या बैठकीनंतर देखील राहुल गांधी यांनी गुलाब नबी आझाद यांच्याशी चर्चा केली होती. पुन्हा एकदा फोन करुन अध्यक्षपदाच्या निवडणुका लवकर होतील, असा विश्वास राहुल गांधींना त्यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुलाब नबी आझाद यांच्याकडून ज्या चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत त्यासंदर्भात पक्षाकडून योग्य ती भूमिका घेतली जाईल. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी लवकरात लवकर निवडणूक घेतल्या जातील. याशिवाय पक्षांतर्गत अन्य निवडणुकाही पार पडतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केलाय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळेल, अशी चर्चा रंगली होती. खुद्द राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष गांधी कुटुंबियातील नसावा, अशी भावना व्यक्त केली होती.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress letter dispute after sibal now rahul gandhi talks to ghulam nabi azad