#DecodingElections : काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले मिझोराम

माधव गोखले
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

गेली दहा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या मिझो नॅशनल फ्रंटने राज्यातील 40 पैकी आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या 32 जागांमधील 21 जागा जिंकून बहुमतासाठी आवश्‍यक असलेला आकडा गाठला आहे. पक्षाचे उमेदवार अन्य पाच जागांवर आघाडीवर आहेत. 

हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड रोखणाऱ्या काँग्रेसने ईशान्य भारतातल्या सप्तभगिनींमधला उरलेला मिझोरामचा किल्ला गमावला आहे. दुसऱ्याबाजूला ईशान्यदिग्विजय करण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षेलाही या निवडणुकीत खीळ बसली आहे. 

गेली दहा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या मिझो नॅशनल फ्रंटने राज्यातील 40 पैकी आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या 32 जागांमधील 21 जागा जिंकून बहुमतासाठी आवश्‍यक असलेला आकडा गाठला आहे. पक्षाचे उमेदवार अन्य पाच जागांवर आघाडीवर आहेत. 

उर्वरीत अकरा जागांपैकी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी पाच जागा जिंकल्या आहेत तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. उरलेल्या आठपैकी पाच जागांवर मिझो नॅशनल फ्रंट आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. 

मावळत्या विधानसभेतल्या सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे नेते, मुख्यमंत्री लालथानहावला यांना दक्षिण चंपाई आणि सेरछिप या दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत मिझोराम मधील मतदानाचा टक्का काहीसा घसरला होता, मात्र मिझो नॅशनल फ्रंटला प्रस्थापित विरोधी मताचा फायदा मिळाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. 

मिझोराममध्ये विकास कामे केल्याचा दावा करीत काँग्रेसने निवडणूक लढवली असली तरी राज्यात असलेली संपूर्ण दारूबंदी शिथिल करण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला होणारा विरोध, राज्यातली पायाभूत सुविधांची विशेषतः रस्त्यांची गरज आणि जमिन वापराचे धोरण, महिलांचे प्रश्न आणि बेकायदेशीर स्थलांतरीतांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती. 
देशात आरोग्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आणि साक्षरतेत तिसऱ्या क्रमांकावर असणारे मिझोराम देशातल्या प्रगतीपथावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. 

मतमोजणीच्या ताज्या स्थितीनुसार मिझो नॅशनल फ्रंटने आतापर्यंत एकूण मतदानातील 37.6 टक्के मते मिळवली आहेत. गेल्या निवडणुकीत ही टक्केवारी 28.65 इतकी होती. सत्ता गमावलेल्या काँग्रेसला 30.2 टक्के मते मिळवता आली आहेत. गेल्या निवडणुकीत 44.63 टक्के मिळवत काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या पारड्यात आतापर्यंत 8.1 टक्के मते जमा झाली आहेत.

Web Title: Congress lost in Mizoram state in Assembly Elections