कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना विधिमंडळ बैठकीस उपस्थित राहण्याची सक्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बंगळूर - ऑपरेशन कमळच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक आज होत असून सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याची सक्‍त ताकीद देण्यात आली आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांवर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपचे ऑपरेशन कमळ फुस्स झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात असला तरी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे राज्यावर अस्थिरतेचे ढग कायम आहेत. असे असताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आल्याने असंतुष्ट आमदार कात्रीत सापडले आहेत. त्यांना शह देण्यासाठीच ही बैठक बोलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे. गैरहजर राहणाऱ्यांवर पक्षांतरबंदी कायद्याच्या कलम १० नुसार कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, काही आमदारांनी या नोटिसीला विशेष महत्त्व दिलेले नसून बैठकीपूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई झाल्यास ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.  

मुंबईला असलेले काँग्रेसचे असंतुष्ट आमदार बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी सकाळपर्यंत बंगळूरला येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. ते बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार चार ते पाच आमदार बैठकीपूर्वीच राजीनामा देणार असल्याचे समजते. असंतुष्ट आमदारांनी राजीनामा देऊ नये. बैठकीला उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी काही नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.

Web Title: Congress MLAs in Karnataka are forced to attend legislative meeting