esakal | काँग्रेस खासदारांची आज बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

National Congress Party

पावसाळी अधिवेशनात प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.

काँग्रेस खासदारांची आज बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी सोनिया गांधींनी कॉंग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची रविवारी (ता. १८) बैठक बोलावली आहे. सीमेवर चीनची आक्रमकता, राफेल लढाऊ विमाने खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरण, इंधन दरवाढ, महागाई यासारख्या मुद्द्यांवर संसद कशी गाजवायची याची व्यूहरचना यात ठरेल. दरम्यान, उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीनंतर कॉंग्रेसने अन्य विरोधी पक्षांचीही बैठक बोलावली आहे.

पावसाळी अधिवेशनात प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. शेतकरी आंदोलन, पेट्रोल आणि डिझेलचे कडाडलेले दर, पर्यायाने वाढलेली महागाई, कोरोना व्यवस्थापनातील गोंधळ, सीमावाद यासारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी आधीच सरकारवर हल्ला चढविण्याची तयारी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी पक्षाच्या लोकसभेतील खासदारांना आक्रमकतेचे धडे देतील. अर्थात ही बैठक व्हर्चुअल स्वरूपात होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात कोरोनामुळं 'कावड यात्रा' अखेर रद्द!

याआधी बुधवारी पक्षाच्या संसदीय रणनीती गटाच्या बैठकीत सोनिया गांधींनी सरकारला घेरण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मोदी सरकारविरोधात अन्य विरोधी पक्षांची एकजूट साधण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना जबाबदारी दिली होती. त्यानुसार, उद्याच विरोधी पक्षांची बैठकही होईल.

तत्पूर्वी, सकाळी सरकारतर्फे बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमध्ये महत्त्वाची विधेयके आणि शासकीय कामकाज यावर सरकार विरोधकांच्या सहकार्याची मागणी करेल. तर सरकारला घेरण्याचे मुद्दे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून यात उपस्थित केले जातील. या सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षांची स्वतंत्र बैठक होणार आहे. सत्ताधारी भाजपनेही अधिवेशनात विरोधकांच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे.

loading image