‘हम दो हमारे दो’चे सरकार

rahul gandhi
rahul gandhi

नवी दिल्ली - ‘देश फक्त चार लोक चालवत असून, केंद्रात ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे. मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे आपल्या दोन मित्रांना संपूर्ण देशातील शेतीमाल साठविण्याचा आणि विकण्याचा अधिकार देणारे आहेत,’’ असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये चढवला. तसेच शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून सरकारची कोंडी करण्याचीही खेळी राहुल यांनी खेळली. 

लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी सहभागी होत कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांच्या तरतुदी आणि हेतूंवर बोलण्यावरून काँग्रेसला टोला लगावला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्युत्तरादाखल राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा उल्लेख करून तोफ डागली. धन्यवाद प्रस्तावाची चर्चा पूर्ण झाली असल्याने राहुल गांधी पुन्हा त्यावर बोलू शकत नाहीत, त्यांनी अर्थसंकल्पावर बोलावे, असा आक्षेप सत्ताधारी बाकांवरून घेण्यात आला.

तर, कृषी हा अर्थसंकल्पाचाच हिस्सा असल्याने कृषी कायद्यांवर बोलणे सयुक्तिक आहे. परंतु, शेतकऱ्यांबद्दल सरकारने स्वतंत्र चर्चेला तयारी दर्शविली नसल्यामुळे विरोध म्हणून आपण अर्थसंकल्पावर बोलणार नाही, असा पवित्रा राहुल गांधींनी घेतला. तसेच, शेतकरी आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. राहुल यांच्या आवाहनानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी बाकांवरील खासदारांनी उभे राहून मौन पाळले. या प्रकारामुळे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला नाराज झाल्याचे दिसून आले. विरोधकांचा हे वागणे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आणि अनुचित असल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले. 

शाब्दीक चकमक
तत्पूर्वी, राहुल यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांची जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी बोलत असताना अडथळे आणणाऱ्यांमध्ये सत्ताधारी खासदारांसोबतच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत, कैलास चौधरी, अनुराग ठाकूर, प्रतापचंद्र सारंगी या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता. कृषी कायदे दोन उद्योगपती मित्रांसाठी आणले असून त्यापैकी एकाला देशातील सर्व शेतीमाल खरेदीचा तर, दुसऱ्याला सर्व शेतीमाल साठविण्याचा एकाधिकार देण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या उद्योगपतींचे नाव घेण्याचे राहुल गांधींनी टाळले. मात्र, राहुल गांधी अन्य मुद्द्यांवर बोलत असल्याचे सांगताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीच अदानी आणि अंबानी यांचे नाव घेतले. अदानी आणि अंबानी ही नावे कोठून आणली हे राहुल गांधी यांनी सिद्ध करावे, असे आव्हान दिल्याने विरोधी बाकांवर खसखस पिकल्याचे दिसून आले.

अन्नसुरक्षा धोक्यात
तीन कृषी कायद्यांमागील उद्दिष्ट हे हवा तेवढा शेतीमाल खरेदीची मुभा देणारे, साठवणुकीची परवानगी देणारे आणि उद्योगपतींकडून रास्त दाम मागण्यासाठी न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार हिरावणारे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. ‘हम दो, हमारे दो’ हे पूर्वी कुटुंबनियोजनाचे घोषवाक्य होते. आता हे घोषवाक्य सरकारला लागू पडत असून ‘हम दो, हमारे दो’ या पद्धतीने फक्त चार लोक देश चालवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. कृषी कायदे लागू झाल्यास शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी उद्ध्वस्त होतील आणि ‘हम दो, हमारे दो’ देश चालवतील. यामुळे देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार असून जनतेपुढे उपासमारीचे संकट ओढवेल, असाही हल्ला राहुल गांधींनी चढवला. 

शेतकरी हटणार नाहीत
कृषी कायदे हा मोदींचा पहिला प्रयत्न नसून याआधी नोटाबंदी, ‘जीएसटी’ सारखे हल्ले मोदींनी केले होते. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना पायपीट करायला लावली. मात्र, उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपये कर्ज माफ केले, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन हे  फक्त शेतकऱ्यांचे नव्हे तर, संपूर्ण देशाचे झाल्याचा दावा केला. शेतकरी एक इंचही मागे हटणार नसून सरकारला कायदे मागे घ्यावे लागतील, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com