रमेश जारकीहोळींना पक्षातच वाढल्या ऑफर्स

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

बंगळूर - रमेश जारकीहोळींनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय निश्‍चित असल्याचे सांगून चार दिवसात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेऊन त्यांनी पुढील वाटचालीवर चर्चा केली. तर दुसरीकडे रमेश यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून मनधरणी सुरू असून पक्षातच त्यांना अनेक ऑफर्स खुल्या केल्या आहेत. 

बंगळूर - रमेश जारकीहोळींनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय निश्‍चित असल्याचे सांगून चार दिवसात यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेऊन त्यांनी पुढील वाटचालीवर चर्चा केली. तर दुसरीकडे रमेश यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून मनधरणी सुरू असून पक्षातच त्यांना अनेक ऑफर्स खुल्या केल्या आहेत. 

श्री. जारकीहोळी यांना पक्षात महत्वाचे पद देण्यास काँग्रेस हायकमांडने प्रस्ताव पुढे केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना बेळगाव किंवा चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे नियोजन आहे. एआयसीसीचे मुख्य सचिवपद देण्याचा काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला असल्याचे समजते. रमेश जारकीहोळी यांनी लोकसभा निवडणूक लढविल्यास त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले आमदारपद त्यांचे बंधू लखन जारकीहोळी यांना देण्याचा विचार हायकमांडने सुरू केला आहे.

बंगळूरमधील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना श्री. जारकीहोळी म्हणाले, ‘राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. यासाठी चार दिवस वेळ द्या. त्यानंतर प्रसार माध्यमांसमोर सर्व काही स्पष्ट करण्यात येईल. गेल्या आठवड्यात काही जणांना हिरो बनविण्यात आले. तर काही जणांना खलनायक बनविण्यात आले. तुम्हाला आधारहीन माहिती देणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीत भाग न घेण्यास माझी काही वैयक्तीक कारणे होती. माझ्याबरोबर किती आमदार आहेत, हे मी तुम्हाला का सांगावे? असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते रागाने म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांना मी भेटणार नाही. तसेच पक्षाच्या संघटनेतही सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार अडचणीत
आपल्या समर्थक आमदारांसह ते गुप्त ठिकाणी गेले व पुढील राजकीय वाटचालीवर त्यांनी चर्चा केली. आमदार आनंदसिंग, नागेंद्र यांच्यासह १० आमदार आपल्या सोबत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. सिध्दरामय्या यांनी रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्ये असल्याचे सांगून ते कोठेच जाणार नसल्याचे म्हटले होते. परंतु जारकीहोळी यांच्या आजच्या हालचालीमुळे औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. जारकीहोळी यांच्या निर्णयामुळे राज्यातील युती सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Congress offers to Ramesh Jarkiholi