
नवी दिल्ली - काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुकीची औपचारिक तारीख जाहीर झाली नसली तरी फेब्रुवारी अखेरपर्यंत पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल, असे पक्षाकडून आज सांगण्यात आले. दरम्यान, आजारपणातील विश्रांतीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पुन्हा सक्रिय झाल्या असून पक्षाच्या संघटनात्मक मुद्द्यांवर पुढील पंधरा दिवस त्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. याअंतर्गत उद्या (ता. १९) वरिष्ठ नेत्यांची पहिली बैठक बोलाविण्यात आली आहे. यात वादग्रस्त पत्रलेखक समूहातील नाराज चेहऱ्यांपैकी काही नेत्यांचाही समावेश असेल.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही जी-२३ गटाच्या नाराज नेत्यांशी भेट असल्याच्या बाबीचा इन्कार केला. कोरोना संकटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्ष नेत्यांना सोनिया गांधींना प्रत्यक्ष भेटता आले नव्हते. त्यामुळे उद्यापासून त्यांनी भेटीगाठींना सुरवात केली आहे. पुढील दोन आठवडे या भेटीगाठी चालतील. शेतकरी आंदोलन, काँग्रेसची निवडणुकीतील भूमिका, आघाडी, रद्द झालेले संसद अधिवेशन यासह संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होणार असून ही भेट विशिष्ट गट, बंडखोर समूहाशी नाही. कारण प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता हा काँग्रेसच्या कुटुंबाचा भाग आहे. ज्येष्ठ नेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. पक्षाने नव्या अध्यक्षांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय केला. ही प्रकिया सुरू आहे. या निवडणुकीच्या घोषणेने सर्व विषय निकाली निघाले असल्याने पक्षात कोणतेही वादाचे मुद्दे राहिलेले नाहीत, असे सुरजेवाला यांनी सांगितले.
मतदार नेते, कार्यकर्ते नव्या अध्यक्षांची निवड करतील. कार्यकारिणीच्या बैठकीतच नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार नेतृत्वाबाबतचे वादाचे मुद्दे संपुष्टात आले आहेत. मात्र राहुल गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे ही पक्षातील ९९.९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते काँग्रेस
आणखी वाचा : PM मोदींनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाले, 'तुमच्यासमोर नतमस्तक...
अनेक बाबींवर चर्चा
तेलंगण प्रदेशाध्यक्षांची निवड, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदल, मध्यप्रदेशातील नेतृत्व बदल यासारखे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. तसेच याआधी राहुल गांधींनी राज्यनिहाय पक्ष नेत्यांची बैठक घेऊन प्रस्तावित आघाडी, मुद्दे याबाबत चर्चा केली होती. यावरही सोनिया गांधींसमवेत नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.