रिजीजू यांचा व्हिडिओ रेणुका चौधरींना झोंबला; हक्कभंग ठराव आणणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मोदींच्या शेऱ्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, कारण त्यांच्याकडून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नाही. मी त्यांना प्रत्युत्तर देऊन माझी पातळी तेवढी घसरू देणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. रिजीजू यांच्याविरुद्धच्या हक्कभंग ठरावासाठी मी कॉंग्रस नेतृत्वाशी चर्चा करेन

नवी दिल्ली - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात जोरजोरात हसत अडथळे आणणाऱ्या कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी व त्यांना पंतप्रधानांनी रामायण मालिकेचा संदर्भ देऊन लगावलेली चपराक हे प्रकरण आज राजकीय अंगाने चिघळले आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी पंतप्रधानांची टिप्पणी व रामायणातील रावणाची बहीण शूर्पणखा हिचे विकट हास्य यांची सांगड घालून शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. हा महिलावर्गाचा अपमान असल्याचे सांगताना चौधरी यांनी आपण मोदी व रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव आणणार असल्याचे सांगितले.

आपण पत्नी व दोन मुलींची आई आहोत, असे सांगताना चौधरी यांचा गळा भरून आला. मंत्री रिजीजू यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंग येऊ घातला आहेच; पण त्यांना येथे बोलू देण्यासही यापुढे कॉंग्रेस कितपत मुभा देईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या "त्या' शाब्दिक फटकाऱ्यानंतर कॉंग्रेसने आज सभागृहात गोंधळ करून सकाळच्या प्रहरातील कामकाज ठप्प केले होते, त्याआधी राज्यसभेतील महिला खासदारांनी राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन पंतप्रधानांच्या टिप्पणीवर जोरदार आक्षेप घेतला होता. आम्ही सर्वांनी मंत्री रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिल्याचे कुमारी सेलजा यांनी सांगितले. पंतप्रधानांनी चौधरी व सभागृहाची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली.

पातळी घसरू देणार नाही
सकाळच्या गोंधळावेळी चौधरी काही बोलू इच्छित होत्या; मात्र विरोधकांच्या आवाजासमोर त्यांना बोलता आले नाही. काल मोदींनी जेव्हा रामायणाचा संदर्भ देत चौधरी यांच्यावर शाब्दिक प्रहार केला, त्या वेळीही त्यांनी लगेच उत्तर देत, ""हा पाहा यांचा महिलांबद्दलचा आदर व सन्मान,'' असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र, तेव्हा झालेला सर्वपक्षीय हास्यस्फोट इतका मोठा होता, की चौधरी यांचे ते वाक्‍य समोर आले नाहीच. त्यांनी आज संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले, की ""मोदींच्या शेऱ्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही, कारण त्यांच्याकडून वेगळ्या वक्तव्याची अपेक्षाच नाही. मी त्यांना प्रत्युत्तर देऊन माझी पातळी तेवढी घसरू देणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. रिजीजू यांच्याविरुद्धच्या हक्कभंग ठरावासाठी मी कॉंग्रस नेतृत्वाशी चर्चा करेन.''

चौधरी यांच्या हसण्याला पंतप्रधानांनी राजकीय प्रत्युत्तर दिले, संसदेमध्ये असे प्रकार होतच असतात; मात्र रिजीजू यांनी फेसबुकवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो अत्यंत अपमानास्पद आहे.
- रंजिता रंजन, कॉंग्रेस खासदार

Web Title: congress-renuka-chaudhary-pm-modi-rajya-sabha