
शिवरायांनी मशिदी बांधल्या हे...; काँग्रेसकडून रियासतकारांना शुभेच्छा
मुंबई : देशभरात मशिदींच्या भोंग्यावरून आणि मंदिरावर मशिदी बांधल्याच्या दाव्यावरून तणाव निर्माण झाला आहे. ज्ञानव्यापी मशिदीच्या नंतर आता इतर मशिदीच्या खालीही हिंदू मंदिरे असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान काँग्रेसकडून 'रियासतकार' गोविंद सरदेसाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना म्हटलंय की, "रायगडावर शिवरायांनी मशीद बांधली हे नमूद करुन जगाला महाराजांचा धर्मनिरपेक्ष विचार दाखवणारे प्रख्यात इतिहासकार 'रियासतकार' गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन." हरियाणातील भाजप महिला मोर्च्याच्या ट्वीटरवरून पोस्ट करण्यात आलेली पोस्ट सावंत यांनी शेअर केली आहे.
ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर आता जामा मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज जयंती आहे. त्यांनी शिवाजी महाराजांनी मशिदी बांधून धर्मनिरपेक्षतेचा पायंडा घातला हे जगाला दाखवून दिले. त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयीची आठ खंडांत 'मराठी रियासत', तीन खंडांत ”मुसलमानी रियासत” व दोन खंडांत 'ब्रिटिश रियासत' या ग्रंथरचनांतून यांनी महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला.
त्यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या हरियाणा महिला मोर्चाच्या ट्वीटरवरून पोस्ट करण्यात आली होती. तीच पोस्ट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शेअर केली आहे. जयंतीनिमित्त पोस्ट शेअर करताना शिवरायांनी मशिदी बांधून जगाला धर्मनिरपेक्षतेचा विचार दाखवणारे प्रख्यात इतिहासकार असा उल्लेख सचिन सावंत यांनी केला आहे.