एक ‘नमस्ते’ अख्ख्या देशाला भोवला ; श्रमिकांची माफी मागा अशी काँग्रेसची मागणी

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

अतिशय घाईघाईने, राज्यांना विश्‍वासात न घेता अचानक घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे असंघटित मजुरांचे अपरिमित हाल झाले, त्याबद्दल देशाच्या संसदेने या लाखो कोट्यावधी श्रमिकांची माफी मागितली पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षांनी लॉकडाउनवर राज्यसभेत ताशेरे ओढले.

नवी दिल्ली : अतिशय घाईघाईने, राज्यांना विश्‍वासात न घेता अचानक घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे असंघटित मजुरांचे अपरिमित हाल झाले, त्याबद्दल देशाच्या संसदेने या लाखो कोट्यावधी श्रमिकांची माफी मागितली पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षांनी लॉकडाउनवर राज्यसभेत ताशेरे ओढले.

राजदचे प्रा. मनोज झा यांनी कोरोना उद्रेकाच्या तोंडावर भारताने केलेला एक नमस्ते (नमस्ते ट्रम्प मेळावा) देशाला भलताच महागात गेला, असा चिमटा काढला. लॉकडाउनमुळे किती नुकसान झाले व कसला फायदा झाला हे सरकारने संसदेला सांगावे अशी मागणी काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी केली. कोरोना संसर्गावरील या चर्चेत पंतप्रधान केअर निधीबाबतही अनेकांनी संशय व्यक्त केला. मात्र अपवाद वगळता साऱ्याच वक्‍त्यांची गाडी कोरोनाऐवजी राजकारणावरच घसरल्याबद्दल अनेक सदस्यांनी नापसंती व्यक्त केली. 

कोरोनाच्या संकटामुळे सरकारी बँकांवर दबाव वाढला - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उद्या चर्चेला उत्तर देतील. झा यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाबाबत टोला लगावताना, हा विदेशातून आलेला विषाणू असल्याचे सांगितले. बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य यांनी कोरोनाबाबत वैद्यकीय जागृती वाढविण्याची गरज प्रतिपादन केली. ‘वायएसआर’चे के. केशव राव यांनी केंद्राचा राज्यांवर विश्‍वास राहिला नाही का?, असा सवाल केला.

मित्रच आला धावून! रशियाने भारतासोबत केला कोरोना लस देण्याचा करार

काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी मागच्या शतकात आलेल्या स्पॅनिश फ्लूचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘आमचे डॉक्‍टर व परिचारिकांसह वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाशी लढण्यासाठीची चांगली कल्पना आली आहे. श्रीलंकेसह अनेक दक्षिण आशियाई व अफ्रिकी देशांनीही कोरोना मृत्यूंची संख्या आटोक्‍यात ठेवण्यात यश मिळविले आहे. पंतप्रधानांनी 24 मार्च रोजी रात्री 8 वाजता अचानकपणे लॉकडाउनची जी घोषणा केली. त्यासाठी सरकारची पूर्वतयारी किती होती ? लॉकडाउनआधी राज्यांना विश्‍वासात घेणे त्यांना का आवश्‍यक वाटले नाही, याची उत्तरे संसदेला मिळायला हवीत.’’

तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी ‘हातात खडू घेऊन कोलकत्यात सामान्य लोकांना सामाजिक अंतरभानाचे धडे देणाऱ्या महिला नेत्या व दिल्लीत मोराबरोबरचे चित्रिकरण करणारे दुसरे नेते, हा मानसिकतेतील फरक आहे,’ असा हल्लाबोल केला. पीएम ‘केअरलेस’ फंडाचा हिशोबही जनतेसमोर यावा अशीही मागणी त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress said One ‘Namaste’ surrounded crisis the whole country and also demands to Central government that apology to workers