हिंदुत्वाची तुलना इसिस, बोकोहरामशी; सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुत्वाची तुलना इसिस, बोकोहरामशी

हिंदुत्वाची तुलना इसिस, बोकोहरामशी

नवी दिल्ली : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या अयोध्या प्रकरणाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या नव्या पुस्तकावरून वाद उफाळला असून त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिस व बोको हरामसारख्या दहशतवादी गटांबरोबर केल्याने भाजप भडकला आहे. भाजपच्या एका समर्थकाने दिल्ली पोलिसांकडे खुर्शिद यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दिली आहे. शिवसेनेनेही खुर्शिद यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

खुर्शिद यांनी पुस्तक प्रकाशनासाठी जो मुहूर्त निवडला त्यावरही भाजप नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वाद उफाळला आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ही लज्जास्पद तुलना असल्याचे सांगून म्हटले, की वसुधैव कुटुंबकम हा मंत्र देणाऱ्या हिंदू धर्माबद्दल अशा अर्ध्या कच्च्या माहितीमुळे या पुस्तकाला प्रसिद्धी मिळू शकेल पण कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. विवेक गर्ग नामक वकिलाने दिल्ली पोलिस आयुक्तांकडेच खुर्शिद यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

भाजपने खुर्शिद यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री मुख़्तार अब्बास नक़्वी, महेंद्रनाथ पांडे, सोशल मीडिया विभागाचे अमित मालवीय, आदींनी टीका केली आहे. नक्वी यांनी म्हटले, की कॉंग्रेस नेत्यांच्या अज्ञानाचे हे आणखी प्रदर्शन आहे. हे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात पण त्यांना हिंदुत्वाचीही माहिती नाही. कधी तालिबान तर कधी अतिरेकी गट, हा सारा यांचा वेडेपणा आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम व दिग्विजयसिंग यांची वक्तव्येही वादग्रस्त ठरली. ‘अयोध्या प्रकरणाचा निकाल दोन्ही पक्षांनी स्वीकारला म्हणून तो चांगला निकाल ठरला. तो चांगला निकाल होता म्हणून दोघांनीही स्वीकारला असे नव्हे,’ असे चिदंबरम म्हणाले.

काय म्हटलंय पुस्तकात

खुर्शिद यांच्या पुस्तकातील १५०० व्या पानावरील ज्या एका ओळींवरून वाद उफाळला आहे ती अशी - भारतातील साधू-संत शतकांपासून जो सनातन धर्म व मूळ हिंदुत्वाची चर्चा करत आहेत. तथापि त्याला आज कट्टर हिंदुत्वाआडून बाजूला सारले जात आहे. आज हिंदुत्वाची अशी राजकीय आवृत्ती काढली जात आहे, जी इसिस व बोको हराम या इस्लामी जिहादी संघटनांबरोबर साधर्म्य सांगते.

हिंदू धर्माबद्दल आदरच: खुर्शिद

सलमान खुर्शिद यांनी म्हटले, की हिंदू धर्माबद्दल आपल्याला आदरच आहे. मात्र हिंदुत्वाची जी राजकीय व्याख्या अलीकडे प्रचलित केली गेली ती आक्षेपार्ह व घातक असून हे नवे-राजकीय हिंदुत्व इसिस व बोको हराम या दहशतवादी गटांच्या कार्यशैलीचे साधर्म्य दाखविते. तब्बल १०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे तटस्थ विश्लेषण वाचायचे तर लोकांनी पुस्तक वाचावे.

loading image
go to top