अग्निपथविरुद्ध काँग्रेसचा सत्याग्रह

प्रियांका गांधी यांचे आवाहन : अहिंसेच्या मार्गाने सरकार पाडा
Congress Satyagraha Againt Agnipath
Congress Satyagraha Againt AgnipathSakal

नवी दिल्ली - सैन्यदलांमधील भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करणाऱ्या अग्निपथ योजनेवरून देशभरात तरुणांमध्ये निर्माण झालेल्या आक्रोशाला काँग्रेसने रविवारी दिल्लीत सत्याग्रह आंदोलन करून पाठिंबा दिला. त्याचवेळी कृषी कायद्यांप्रमाणेच अग्निपथ योजनाही सरकारला मागे घ्यावी लागेल, असा इशारा दिला.

या योजनेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांप्रमाणेच प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून या योजनेच्या निमित्ताने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसने रविवारी जंतर मंतरवर आंदोलन केले. सरचिटणीस प्रियांका गांधी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, प्रदेशाध्यक्ष, दोन्ही सभागृहांमधील खासदार यात सहभागी झाले होते.

जंतर मंतरवर प्रियांका गांधी यांनी सरकारवर तोफ डागली. ही योजना देशातील तरुणांना मारणारी तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या सेनादलांना नष्ट करणारी आहे, असे त्या म्हणाल्या. ‘या सरकारला ओळखा, सरकारची नियत ओळखा. लोकशाही पद्धतीने, अहिंसेच्या मार्गाने हे सरकार पाडा,‘ असे आवाहन त्यांनी केले. राजस्थानमधील नेते सचिन पायलट यांनी सरकारला आडमुठेपणा न करण्याचा सल्ला दिला.

भाजपचे प्रत्युत्तर

काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनावर भाजपने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हा सत्याग्रह नेमका कोणासाठी आहे,‘ असा खोचक सवाल करून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रियांका गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की सेनादलांमध्ये सुधारणा कधी करणार यासाठी प्रियांका यांनी आग्रह धरायला हवा होता. मात्र आग्रहाऐवजी विरोधाचा सत्याग्रह केला जात आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात हवाई दलासाठी विमाने खरेदी करण्यात आली नाहीत. आम्ही राफेल आणले, पण त्यावरूनही राजकारण केले गेले. आता अग्निपथ योजनेवरून राजकारण केले जात आहे.‘ काँग्रेसला देशातील तरुणांची किंवा सैन्यदलाची चिंता नसून या पक्षाचा मूळ उद्देश केंद्रातील सरकार पाडण्याचा आहे, असा प्रहार पात्रा यांनी केला.

‘पकोडे तळण्याचेच ज्ञान’

मागील आठ वर्षांत देशातील तरुणांना केवळ पकोडे तळण्याचेच ज्ञान मिळाले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) ते सोमवारी हजर राहणार आहेत. ते सत्याग्रहात सहभागी झाले नव्हते. त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ‘वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून पंतप्रधानांनी देशातील तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथावर चालविण्यासाठी भाग पाडले आहे. आठ वर्षांत १६ कोटी नोकऱ्या द्यायच्या होत्या. परंतु तरुणांना फक्त पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले. देशाच्या या स्थितीला केवळ पंतप्रधान जबाबदार आहेत,’ अशी टीका राहुल यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com