डिबेटने घेतला बळी? वाहिन्यांवरील आक्रस्तळेपणाविरुद्ध कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

राजीव त्यागी यांच्या निधनानंतर मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, कुठपर्यंत हे विखारी वादसंवाद कार्यक्रम आणि विषारी प्रवक्ते संयम, साधेपणाचे प्राण घेत राहतील?, कधीपर्यंत हा टीआरपीचा धंदा सुरू राहील?, असे प्रश्न ट्विटद्वारे विचारले होते. 

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं बुधवारी हर्ट अटॅकने निधन झाले. त्यागी एका खाजगी चॅनलच्या डिबेट शोमध्ये सहभागी झाले होते. ऑनलाइन चालू असलेल्या या कार्यक्रमात त्यागी यांना सारखा घाम येत होता. तसेच ते छातीही सारखे चोळत होते. अचानक ते चालू कार्यक्रमात कोसळले होते. घरी त्यागीजींना कार्डियाक मसाज आणि सीपीआर दिलं होतं. पण त्याचा काहीही उपयोग होत नसल्यामुळे त्यांना तात्काळ यशोदा दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. दवाखान्यात डॉक्टरांनी 45 मिनिटे वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

डॉक्टरांच्या मते, त्यागींना हर्ट अटॅकनंतर घरी प्राथमिक उपचारानंतर 6:30 ला दवाखान्यात आणलं होतं. ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात आणलं गेलं होतं त्यावेळेस ते बेशध्द अवस्थेत होते तसेच ते कसलाही प्रतिसाद देत नव्हते. बीपी आणि पल्सही बंद झाले होते. त्यानंतर आम्ही अडवांस कार्डियक लाइफ केयर प्रोटोकॉलखाली उपचार सुरू केले. नंतर त्याना व्हेंटिलेटरवर ठेऊन 45 मिनिटे सीपीआर, इंजेक्शन आणि लाइफ सेविंग ड्रग्स दिले. त्यानंतरही ते वाचू शकले नाहीत.

वृत्तवाहिनीवरील चर्चेतील सहभागानंतर कॉंग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे कॉंग्रेसने वृत्तवाहिन्यांवर आक्रस्तळेपणाने होणाऱ्या वादसंवाद कार्यक्रमांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून अशा सनसनाटी चर्चा कार्यक्रमांसाठी आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली आहे. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, कुठपर्यंत हे विखारी वादसंवाद कार्यक्रम आणि विषारी प्रवक्ते संयम, साधेपणाचे प्राण घेत राहतील?, कधीपर्यंत हा टीआरपीचा धंदा सुरू राहील?, असे प्रश्न ट्विटद्वारे विचारले होते. 

हे वाचा - दिल्ली ते बेंगळुरू हिंसाचाराचं असंही कनेक्शन; 7 FIR मध्ये 16 जणांची नावे

राहुल गांधींनी राजीव त्यागी यांना कॉंग्रेसचा बब्बरशेर म्हणून श्रद्धांजली अर्पण केली होती. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनीही त्यागी कुटुंबीयांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यापार्श्वभूमीवर, जयवीर शेरगील यांनी मंत्री जावडेकर यांना त्यांच्या प्रवक्तेपदाचीही आठवण करून देताना म्हटले आहे, की बहुतांश वृत्तवाहिन्यांवरील वादसंवाद कार्यक्रमांचे स्वरुप प्रवक्त्यांना अतिरंजीत, बदनामीकारक आणि आक्रस्तळेपणाने बोलण्यासाठी भाग पाडणारे आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे,की वृत्तवाहिन्यांवरील माहितीपूर्ण चर्चेऐवजी आता मनोरंजनाच्या नावाखाली सनसनाटीपणाला खतपाणी घातले जात आहे.

हे वाचा - सचिन पायलट पोहोचले, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी

लोकशाहीच्या रक्षणासाठी या वृत्तवाहिन्यांवरील वादसंवाद कार्यक्रमांमध्ये एकमेकाशी आदरपूर्वक असहमती व्यक्त करण्याच्या मुलभूत तत्वाची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली आहे. वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांनी अपमानजनक भाषा वापरू नये, लक्ष्मणरेषा पाळावी यासाठी आचारसंहितेची गरज असल्याचेही आवाहन शेरगील यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress send letter to minister prakash javadekar over television debate