esakal | काँग्रेसची राष्ट्रवादीवर नाराजी; शरद पवार यांना पाठविले पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

ncp congress

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये जाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसची राष्ट्रवादीवर नाराजी; शरद पवार यांना पाठविले पत्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये मंगळवारी काँग्रेसचे माजी नेते पीसी चाको यांनी पक्ष प्रवेश केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी देशातील पाच राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मत व्यक्त केलं होतं. भाजपच्या विरोधात जिथं लढता येईल तिथं समविचारी पक्षांसोबत जाऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. तसंच देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये जाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी तृणमूलचा प्रचार टाळावा, असा आवाहनवजा इशाराही देण्यात आला. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी पवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यांनी म्हटले आहे की तृणमूलचे स्टार प्रचारक या नात्याने त्यांची हजेरी मतदारांचा गोंधळ वाढविणारी ठरेल. त्यामुळे त्यांनी जाण्याचे टाळावे.

हे वाचा - मी घराबाहेर निघू नये, म्हणून भाजपचा डाव; ममतादीदींचा गंभीर आरोप

भट्टाचार्य यांच्या पत्राबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी तसेच अन्य नेत्यांनी मात्र सूचक मौन पाळले आहे. लोकशाहीवादी पक्षांनी ममतांच्या मदतीसाठी बंगालमध्ये जाण्याची गरज आहे, असे पवार यांनी कालच म्हटले होते. एक ते तीन एप्रिल दरम्यान दौरा करण्याची घोषणा त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर भाजपविरोधात समर्थ पर्याय उभा करण्यासाठी तिसऱ्या आघाडीसारख्या व्यापक व्यासपीठाची मागणी समविचारी पक्षांकडून सुरू असल्याचे सांगत पवार यांनी नव्या समीकरणांचे संकेत दिले होते. अर्थात, अशी आघाडी स्थापण्याचा किंवा त्यासाठी चेहरा पुढे करण्याचे अद्याप काहीही ठरले नसले तरी यातून भाजपला पर्याय देण्यात काँग्रेस समर्थ नसल्याचेही अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारमध्ये भागीदार असून संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएमध्येही राष्ट्रवादीचा समावेश आहे. मात्र केरळमध्ये राष्ट्रवादी सत्ताधारी डाव्या आघाडीचा हिस्सा असून विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. बंगालमध्ये काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीशी युती करून तृणमूलसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचा - नाही नाही नाही; केंद्र सरकारच्या 6 खुलाशांची होतेय चर्चा

बंगालसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींसह ३० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. बंगालप्रमाणेच निवडणुकीला होणाऱ्या केरळ, तमिळनाडूमध्ये राहुल यांच्या प्रचारसभा झाल्या आहे. आसाममध्ये राहुल १९-२० मार्चला, तर प्रियांका २१-२२ मार्चला जाणार आहेत. मात्र बंगालमध्ये गांधी भावंडांचा दौरा अजूनही ठरला नसल्याचे काँग्रेसमधून कळते.