कॉंग्रेसने देशाची दिशाभूल करू नये 

कॉंग्रेसने देशाची दिशाभूल करू नये 

नवी दिल्ली (पीटीआय) : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यावर "खोट्या आणि कथित माहितीवरून देशाची दिशाभूल करू नये आणि सुरक्षा दलांचा अपमान करू नये,' अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेसला सोमवारी ठणकावले. 

विरोधकांवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले, "जेव्हा दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना मारले जात होते, त्या वेळी कॉंग्रेस आणि तिचे मित्रपक्ष रडत होते, हा योगायोग आहे की भागीदारी? आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी संपूर्ण देश एकदिलाने एकटवला होता, त्या वेळी कॉंग्रेस आणि आघाडीतील पक्ष असे प्रश्‍न विचारत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.'' हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या शंकांबद्दल बोलताना नक्वी यांनी त्यांच्या "बेजबाबदार वागणुकी'वर टीका केली. "देशाच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर त्यांची मानसिकता या विचारांमधून दिसून येते. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईचे स्वागत कॉंग्रेस व मित्रपक्षांनी करावे, अशी देशाची अपेक्षा नाही; पण निदान त्यांनी खोट्या व कथित गोष्टींवरून देशाची दिशाभूल करू नये व सुरक्षा दलांचा अपमान तरी करू नये,'' असे ते म्हणाले. 

जावडेकरांचेही टीकास्त्र 
या प्रकरणावरून केंद्रीय उच्चशिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही विरोधकांना आज उत्तर दिले. "दहशतवाद्यांविरोधातील कारवाईची माहिती उघड करता येत नाही. तसे केल्यास संबंधित देशाला (पाकिस्तानला) मदत केल्यासारखे होईल. बालाकोटमधील हल्ल्याचे पुरावे मागणे म्हणजे आपल्या सशस्त्र दलांवर अविश्‍वास दाखविण्यासारखे आहे,'' असे ते म्हणाले. हवाई दलाबद्दल संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. पश्‍चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात आज भाजपच्या बुद्धिवंतांच्या गटाची बैठक आयोजित केली होती. त्यात जावडेकर यांनी विरोधकांवर टीका केली. भाजप जवानांच्या पराक्रमाचा राजकीय हेतूसाठी कधीही वापर करीत नाही, असे सांगताना त्यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्याचे उदाहरण दिले. त्या वेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी लष्कराने दाखविली होती; पण तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्यांना परवानगी दिली नाही. सध्याच्या सरकारने हल्ल्याला परवानगी दिली, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com