कर्नाटकात युतीची गरज नाही, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

'काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या युतीची गरज नसून, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल.'' 

- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सिद्धरामय्या म्हणाले, ''काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या युतीची गरज नसून, काँग्रेस स्वबळावर निवडून येईल.'' 

इंग्रजी वृत्तवाहिनी 'टाइम्स नाऊ'च्या 'कर्नाटक नाऊ : सिझ द मोमेंट' या कार्यक्रमात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसंदर्भातील आवश्यक मुद्दे आणि उमेदवारांच्या सहभागाबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यावरही सिद्धरामय्या यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ''मोदींनी देवेगौडा यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनामुळे आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचे सांगितले. त्यांच्या या अशाप्रकारामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही''. 

ते पुढे म्हणाले, ''राज्यात दोनवेळा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा पंतप्रधान मोदींनी राज्यासाठी कोणताही निधी दिला नाही. तसेच त्यावेळी भारत सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. त्यांनी कर्नाटकासाठी काय केले. तसेच मोदींनी अद्यापही महादायी नदीच्या प्रश्नावर कोणताही उपाय काढला नाही. कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कोणतेही योगदान दिलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस बहुमताने निवडून येईल'', असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. 

Web Title: Congress will win alone won not need to ally with JDS or anyone says Siddaramaiah