काँग्रेसने पराभवानंतर उचलले पाऊल; प्रवक्त्यांवर घातले निर्बंध

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मे 2019

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले आहे, की महिनाभर वाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये कोणताही काँग्रेस प्रवक्ता सहभागी होणार नाही. तसेच प्रत्येक वृत्तवाहिनीच्या संपादकांना विनंती आहे, की त्यांनी काँग्रेसच्या कोणत्याही प्रवक्त्याला चर्चेसाठी निमंत्रित करू नये. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला उपरती झाली असून, आता काँग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना पुढील महिनाभर वाहिन्यांवरील कोणत्याही चर्चेत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसमध्ये सध्या जोरदार घडामोडी घडत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अद्यापही राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यांच्या मनधरणीचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होत असून, काँग्रेसने प्रवक्त्यांवर निर्बंध घातले आहेत. 

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर विविध वाहिन्यांवर चर्चा होत असून, या चर्चांमध्ये सहभागी होऊन पक्षाला धोकादायक ठरतील अशी मते प्रवक्त्यांकडून मांडली जात आहेत. त्यामुळे काँग्रेसने पुढील महिनाभर एकही प्रवक्त्याने वाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. 

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले आहे, की महिनाभर वाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये कोणताही काँग्रेस प्रवक्ता सहभागी होणार नाही. तसेच प्रत्येक वृत्तवाहिनीच्या संपादकांना विनंती आहे, की त्यांनी काँग्रेसच्या कोणत्याही प्रवक्त्याला चर्चेसाठी निमंत्रित करू नये. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress wont send spokespersons on TV news channel debates for a month