राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मे 2019

- काँग्रेस कार्यकारिणीने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या कार्यकारिणीत मांडला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळून लावला. 

दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक आज सकाळी पार पडली. या बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सांगितले, की राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, समितीमधील नेत्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. कार्यकारिणीने पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींनाच दिले आहेत. आता लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Working Committee rejected Rahul Gandhi proposal of resignation