
माझा चहा कामगार ही लढाई जिंकेलच. भारतीय चहावर केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये एवढी शक्ती नाही की ते आमच्या चहाच्या बागांत काम करणाऱ्या कामगारांचा सामना करू शकतील असे मोदी म्हणाले.
धेकियाजुली (आसाम) - ‘‘भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा कट परदेशी शक्ती आखत आहेत. चहामुळे भारताची जी ओळख निर्माण होत आहे, ती पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशाला बदनाम करण्यासाठी कारस्थान करणाऱ्यांना आता चहाच्या क्षेत्रालाही सोडलेले नाही,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.
येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असलेल्या आसामला पंतप्रधानांनी गेल्या १५ दिवसांत दिलेली ही दुसरी भेट आहे. ‘आसाम माला’ या राज्य रस्ते प्रकल्पाचे तसेच विश्वनाथ आणि चराइदेव येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाची अंदाजे किंमत ११०० कोटी रुपये आहे. स्थानिक भाषेमध्ये शिक्षण देणारे किमान एक वैद्यकीय महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण देणारे महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावे, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हिंसा, तणाव, भेदभाव, पक्षपात अशी गोष्टी सोडून संपूर्ण ईशान्य भारत प्रगतीच्या मार्गावर चालत आहे. आसाम यात प्रमुख भूमिका बजावत आहे, से सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आसामची प्रगती ही चहाच्या मळ्यांतील कामगारांच्या प्रगतीशी संबंधित आहे. देशाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करणारे, एवढ्या पातळीपर्यंत पोचले आहेत की भारताच्या चहाला देखील सोडत नाहीत. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेल, हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचे आहे, योजनाबद्धरीत्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची काही कागदपत्रेही समोर आली आहेत. ज्यांनी भारतीय चहाला बदनाम करण्याचे काम हाती घेतले आहे व त्यांच्यासाठी इथे जे गप्प बसले आहेत, त्या सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक चहा बागायतदार उत्तर मागेल. भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल. प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल.”
‘‘त्यांनी हवी तेवढी कारस्थाने करावीत मात्र देश यांच्या चुकीच्या योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई जिंकेलच. भारतीय चहावर केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये एवढी शक्ती नाही की ते आमच्या चहाच्या बागांत काम करणाऱ्या कामगारांचा सामना करू शकतील’’ असे मोदी म्हणाले. ‘ग्रीनपिस’ या स्वंयसेवी संस्थेने एक अहवाल जाहीर केला आहे, त्यात आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. या अहवालाचा उल्लेख न करता पंतप्रधानांनी टीका केली. गेल्या पाच वर्षांत आसाममधील आरोग्य आणि पायाभूत सुविधा सुधारल्याचा दावाही मोदींनी या वेळी केला.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
योजनांची माहिती
चहाच्या मळ्यांमधील मजुरांसाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या योजनांची मोदी यांच्याकडून भाषणात माहिती
मजुरांच्या सुमारे साडे सात लाख बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा
याप्रसंगी इतरही योजनांचा तपशील जाहीर
व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे दोन लाख युवकांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्राथमिक भांडवलासाठी
सुमारे ३० हजार शिक्षकांची नियुक्ती
२२ लाख कुटुंबांसाठी दरमहा ८३० रुपयांची मदत
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एक हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारने यावर्षी अर्थसंकल्पात चहाच्या मळ्यांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच चहाच्या मळ्यांत काम करणाऱ्या कामागारांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे. तसेच चहा मळ्यांच्या परिसरात फिरती आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दुर्गम भागामध्येही वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच स्थानिकांच्या भाषेतून त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या डॉक्टरांची फळीही तयार केली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.