कोरोना संक्रमित महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

छत्तीसगढची राजधानी रायपूरमधील AIIMS मध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या एका महिलेने एकावेळी तीन बालकांना जन्म दिला आहे

छत्तीसगढची राजधानी रायपूरमधील AIIMS मध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या एका महिलेने एकावेळी तीन बालकांना जन्म दिला आहे. याबाबतची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. संस्थेच्या नियोनेटोलॉजी विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली धमतरी जिल्ह्यातील 28 वर्षीय कोरोना व्हायरसने संक्रमित महिलेने एकावेळी तीन बालकांना जन्म दिला आहे. तसेच व्हायरसने संक्रमित असलेल्या आणखी एका महिलेने दोन मुलांना जन्म दिला आहे. या सर्व मुली आहेत. 

हेही वाचा - आरोग्य सेतू ऍपबाबत गोलमोल उत्तरे देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; केंद्र सरकारचे आदेश

अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाचही मुली एनआयसीयूमध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. यातील दोन बाळांना त्यांच्या आईजवळ पाठवले गेले आहे तर तीन मुली अद्याप एनआयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. कोविड-19 ने संक्रमित महिलेला तीन बाळांना जन्म देण्याची एम्समधील ही पहिलीच घटना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ती महिला आणि पती शासकीय सेवेत कार्यरत आहेत. स्त्री रोग विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेची प्रसुती वेळेआधीच 18 ऑक्टोबरला झाली. महिलेने तीन बाळांना जन्म दिला. 

या घटनेबाबत ट्विट करुन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे. कोरोनायोद्ध्यांच्या निश्चयापुढे कोरोना नतमस्तक झाला आहे, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितंल की, या बाळांना कोविड-19 च्या संक्रमणापासून वाचवून त्यांची देखरेख करणं अवघड काम होतं. एम्सच्या डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारलं. त्यांनी म्हटलं की, जवळपास पाच दिवसांपर्यंत या तीन मुलींना एनआयसीयूमध्ये ठेवलं गेलं. यातील दोन ठीक झाल्यावर त्यांना आईकडे पाठवलं गेलं. तिथे संपूर्ण सुरक्षेसह या बाळांची काळजी घेतली जात आहे. अजूनही एक बाळ आयसीयूत आहे. 

हेही वाचा - 'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

या तीनही बाळांना कोरोनाचे संक्रमण झालेले नाहीये. अजूनही या बाळांची चाचणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आणखी एका महिलेला 19 ऑक्टोबर रोजी जुळ्या मुलीच झाल्या आहेत. त्यांनाही याप्रकारेच उपचार दिले गेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive woman gave birth to triplets health minister praises doctors