'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

सात निश्चय योजना ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे आणि त्याचा व्यवस्थितरित्या तपास व्हायला हवा.

पाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज शुक्रवारी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची 'सात निश्चय योजना' ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

ही तर फक्त सुरवात आहे. जे कुणी सात निश्चय योजनेशी निगडीत आहेत त्यांचा तपास केला जाईल आणि योग्य कारवाईदेखील केली जाईल. मी हे सतत म्हणत आलोय की सात निश्चय योजना ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे आणि त्याचा व्यवस्थितरित्या तपास व्हायला हवा. याचा तपास होईल या भीतीतच ते आहेत. आम्ही फक्त याच्या तपासाबाबत बोलतोय तर नितीश कुमार का घाबरत आहेत? चिराग पासवान यांनी मुंगेर फायरिंग घटनेबाबतही प्रतिक्रीया दिली आणि त्यांनी या घटनेसाठी नितीश कुमारांना जबाबदार ठरवलं. 

हेही वाचा - Bihar Election : जातींच्या लोकसंख्येनुसार मिळावं आरक्षण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांची नवी खेळी

 त्यांनी म्हटलं की, या प्रकारच्या घटना बिहारमध्ये वाढल्या आहेत. जमूई या माझ्या लोकसभा मतदारसंघातही याप्रकारच्या घटना घडल्या आहेत. जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच जातीव्यवस्थेच्या विचारात मग्न असतील तिथे आपण दुसरं काय अपेक्षित तर करु शकतो? व्होट बँक पॉलिटीक्स करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणीतरी आदेश दिलाच असेल आणि म्हणूनच याला मुख्यमंत्री नितीश कुमारच जबाबदार आहेत. 

गुरुवारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 15 कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत जे जल नल योजनेशी निगडीत आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीआधीच नितीश कुमारांनी 2.7 लाख कोटी रुपयांची सात निश्चय योजना जाहीर केली होती. वीज, सांडपाण्याची विल्हेवाट, संडास, पिण्याचे पाणी, रस्ते आणि शेतीला पाणी असे काही महत्त्वाचे मुद्दे या योजनेअंतर्गत होते. नितीश कुमारांनी ही निवडणुक राजद-काँग्रेससोबत लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारला जाहीर केलेल्या 1.25  लाख कोटी रुपयांच्या योजनेला शह देण्यासाठी म्हणून नितीश कुमारांनी ही योजना जाहीर केली होती. 

हेही वाचा - नितीश कुमारांनी राज्यातील आरोग्य आणि उद्योग क्षेत्र केले उद्ध्वस्त; तेजस्वींची घणाघाती टीका

चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ही एनडीएचाच भाग होती. मात्र, नितीश कुमारांच्या जेडीयूशी असलेले मतभेद पुढे करत लोजपाने राज्यात एनडीएपासून फारकत घेऊन निवडणुका लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. असं असलं तरीही केंद्रात एनडीएशीच संगनमत कायम ठेवलं असून चिराग पासवान मोदींचे समर्थन करत स्वत:ला 'मोदींचे हनुमान' म्हणवून घेतात. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 55.69 टक्के लोकांनी मतदान केले आहे जे 2015 च्या टक्केवारीहून अधिक आहे. या निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saat Nischay Yojana biggest scam in Bihar's history says Chirag Paswan