अतिघाई महागात पडेल; कोरोना चाचण्यांबाबत आरोग्य मंत्रालाचे राज्यांना 'डोस'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

चाचण्यांचा आकडा वाढविण्याच्या नादात बहुतांश ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांचे निष्कर्ष हेच अंतिम मानणाऱ्या दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडूसह इतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाची सूचना केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाबाबत झटपट निर्णय देणाऱ्या ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळणाऱ्या पण तरीही कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्याही अनिवार्य कराव्यात, असा आग्रह केंद्र सरकारने राज्यांना केला आहे. चाचण्यांचा आकडा वाढविण्याच्या नादात बहुतांश ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांचे निष्कर्ष हेच अंतिम मानणाऱ्या दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडूसह इतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही सूचना केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा कल कायम असलेली दिल्ली व महाराष्ट्रासह काही मोठी राज्ये ‘रॅपिड अँटीजेन’ चाचण्यांवरच थांबत आहेत. तमिळनाडूने तर आरटी पीसीआर चाचण्यांना संपूर्णपणे फाटाच देऊन टाकला आहे. चाचण्यांची घाई केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडे दिल्ली सरकारचे कान उपटले होते. या अशा घाईमुळे काही राज्यांतील नव्या रुग्णांची संख्या एक तर सतत वाढते किंवा कमी झाल्यानंतर पुन्हा प्रचंड वाढते, असे आढळल्यावर आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्या कराच, असा आग्रह धरला आहे. याबाबत केंद्राने तूर्त सक्ती करण्याचे पाऊल उचललेले नसले तरी केवळ चाचण्यांची संख्या व पॉझिटिव्ह परिणाम दिसणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढविण्याचा काही राज्यांचा कल कायम राहिला तर तसेही करावे लागेल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिला. 

हे वाचा - हॉस्पिटलच्या चुकीमुळे बाळाचा हात पडला काळा आणि...

अनेकदा कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या रॅपिड चाचण्या करून निगेटिव्ह अहवाल येताच तो ग्राह्य व अधिकृत धरला जातो. प्रत्यक्षात तो कोरोना रूग्णच असतो व तो नंतर समाजात सरसकट मिसळतो व इतरांनाही संसर्गाचा धोका वाढवतो हे प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळेच आरोग्य मंत्रालय व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबत अशा राज्यांना संयुक्तरीत्या पत्रेही पाठविली आहेत. चाचण्यांबाबत राज्यांनी याबाबत घाई करू नये ती साऱ्या देशाला भलतीच महागात पडेल असाही इशारा देण्यात आला आहे.

कशा होतात चाचण्या
 रॅपिड अँटीजेन चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच तपासणी होते. आरटी-पीसीआर चाचणीमध्ये याबरोबरच रुग्णाच्या घशात एक नलिका टाकून घशातील द्रावाचा नमुना घेतला जातो व नंतर तो प्रयोगशाळेकडे पाठवून त्याची रिबोन्यूल्सेकिक पद्धतीने (आरएनए) म्हणजे सूक्ष्म तपासणीही होते. याचे परिणाम जवळपास १०० टक्के अचूक येतात असे प्रगत देशांतही आढळले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रॅपिड अँटीजेन' चाचण्यांचे परिणाम तासाभरात मिळतात तर आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यास सहा तासांपासून बारा तास लागतात. रॅपिड चाचण्यांचे परिणाम अहवाल चुकीचे निघत असल्याचा अनुभव आहे. मुंबईतील दोन मोठ्या वैद्यकीय प्रयोगशाळांनी केलेल्या अभ्यास अहवालानुसार रॅपिड चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळलेले किमान तब्बल ६५ टक्के रूग्ण आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये हमखास कोरोनाग्रस्त आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona rapid antigen test effect health ministry letter to all states