Corona Updates: गुड न्यूज! देशातील कोरोनाचा प्रभाव ओसरतोय; जाणून घ्या सकारात्मक बाबी

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

भारतात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याचे दिसले आहे. देशात जानेवारीच्या उत्तरार्धापासून सुरु झालेल्या चाचण्यांची संख्या आजघडीला 9 कोटींच्या पुढे गेली आहे.

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याचे दिसले आहे. देशात जानेवारीच्या उत्तरार्धापासून सुरु झालेल्या चाचण्यांची संख्या आजघडीला 9 कोटींच्या पुढे गेली आहे. या वाढलेल्या चाचण्यांच्या संख्येमुळे देशातील कोरोना रुग्ण वाढीचा दरदेखील कमी होत गेल्याचे दिसले आहे. 

रुग्णवाढीचा दर मंदावला-
सध्या देशात 100 कोरोना चाचण्या केल्या तर त्यातील 8 पेक्षा कमी रुग्ण कोरोनाग्रस्त आढळत आहेत, म्हणजे देशातील कोरोना रुग्ण वाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हाच कोरोना रुग्णवाढीचा दर जानेवारीमध्ये 8.25 होता.

 

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 61 हजार 871 रुग्णांचे निदान झाले असून 1033 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 7 लाख 83 हजार 311 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 65 लाख 97 हजार 210 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रप्रपंचावर अमित शहांचं भाष्य; म्हणाले...

रिकव्हरी रेटमध्ये लक्षणीय वाढ-
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांच्या पुढे गेला होता. मागील तीन आठवड्यांत रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने सुधारणा होत गेली. मागील 24 तासांचा विचार केला तर देशातील सध्याचा कोरोना रिकव्हरी रेट तब्बल 87.78 टक्क्यांवर गेला आहे. या तीन आठवड्यांत रिकव्हरी रेटमध्ये 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदविली गेली आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडाही कमी झाला-
रोज देशात हजारो कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. त्यामुळे ऍक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत मागील तीन आठवड्यांपासून वारंवार घट झाल्याचे दिसले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशात जवळपास 15 टक्के (झालेल्या चाचण्यांच्या) कोरोना रुग्ण उपचार घेत होते. सकारात्मक बाब म्हणजे मागील तीन आठवड्यांत 4 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे सध्या देशात 10.7 टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशात सध्या कोरोनावरील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8 लाखांच्या खाली गेली आहे. 

शनिवारी देशात कोरोनाच्या 9 लाख 70 हजार 173 चाचण्या झाल्या आहेत. तर देशातील आतापर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या 9 कोटी 42 लाख 24 हजार 190 झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered patients in India is in good conditions