पुण्यातून कोरोना काढतोय पळ; दिल्ली, बेंगळुरूत पसरतोय पाय!

प्रमोद सरवळे
Friday, 16 October 2020

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळला होता. आज जवळपास 9 महिन्यात भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 73 लाखांच्या वर गेला आहे.

नवी दिल्ली/ बेंगळुरू: देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळला होता. आज जवळपास 9 महिन्यात भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 73 लाखांच्या वर गेला असून आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यांत कोरोनाचा अधिक प्रसार होताना दिसत आहे. सुरुवातीला मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले होते, पण आता त्यावर थोडा लगाम बसला आहे. 

मुंबईतील कोरोना आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश-
मुंबईतील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यास राज्य सरकार आणि मुंबई महापालिका काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. दुसऱ्याबाजूला राज्यात पुण्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला होता. या काळात राज्यात प्रतिदिन सर्वाधिक पुण्यात नवीन कोरोना रुग्णांचे निदान होत होते. सध्याही हे प्रमाण तसेच आहे, पण नवीन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. इतर राज्यांचा विचार केला तर केरळ आणि दिल्लीत सुरुवातीला कोरोनाने कहर घातल्यावर तिथे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला होता. पण आता केरळसह दिल्लीत प्रतिदिन कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. 

Corona Updates: दिलासादायक! जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी मृत्यू
 
दिल्लीने पुण्याला टाकले मागे-
शहरांचा विचार केला तर काही दिवसांपुर्वी देशात रोज सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळत होते. ऑगस्टच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पुण्यात प्रतिदिन तब्बल 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. त्यानंतर नवीन रुग्ण आढळण्याच्या संख्येत घट होत गेली आणि मागील 3 दिवसांत पुण्यात प्रतिदिन दीड हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर आता दिल्लीने कोरोनाच्या आकडेवारीत पुण्याला मागे टाकले आहे. सध्या दिल्लीत प्रतिदिन तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. गुरुवारी दिल्लीत जवळपास 3 हजार 500 रुग्ण आढळले होते. तर आतापर्यंत दिल्लीत 3.20 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे दिल्ली या शहरात सध्या प्रतिदिन सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच दिल्लीत कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्णही पुण्यातील रुग्णांपेक्षा जास्त आहेत. 

बेंगळुरुमध्येही कोरोनाचा कहर-
मागील दोन आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर दिल्लीसोबत बेंगळुरू या शहरातील कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याचे जाणवते. या आठवड्यात  बेंगळुरुमध्ये तीन वेळेस प्रतिदिन पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत आतापर्यंत प्रतिदिन 4.5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान झाले नाही. बेंगळुरुमधील आणि इतर शहरांतील वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे कर्नाटक सध्या केरळनंतर कोरोना रुग्ण आकडेवारी वाढीच्या दरात दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. मागील तीन आठवड्यांपासून कर्नाटकात 10 हजारांपेक्षा रुग्ण आढळत आहे.  

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 895 रुग्णांचा मृत्यू होऊन नवीन 63 हजार 371 रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 73 लाख 70 हजार 469 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 64 लाख 53 हजार 780 जण कोरोनामुक्त झाले असून 8 लाख 4 हजार 528 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 1 लाख 12 हजार 161 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update in pune delhi and Bengaluru