डिसेंबर महिन्यात एस्ट्राझेनेका लशीचे 10 कोटी डोस होतील उपलब्ध 

vaccine
vaccine

नवी दिल्ली : कोरोना रोगाने जगभरातच थैमान घातले आहे. भारतातदेखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. युरोपातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दिवाळी सणानंतर भारतातदेखील कोरोनाचे रुग्ण वाढतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या साऱ्या  पार्श्वभूमीवर फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात परिणामकारक अशी लस येण्याची वाट बघितली जात आहे. ऑक्सफर्डच्या एस्ट्राझेनेका लशीबाबत आशेने पाहिलं जात आहे. या लशीचे 10 कोटी डोस पुढील महिन्यात भारतात उपलब्ध होतील, असं म्हटलं जात आहे. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाची एस्ट्राझेनेका ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने तयार केली जात आहे. या लशीच्या अंतिम टप्प्यातील ट्रायलचे निष्कर्ष अपेक्षित आणि समाधानकारक येण्याची अपेक्षा आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत 1 अब्ज डोसच्या उत्पादनासाठी करार केला आहे. सीरमला डिसेंबर महिन्यापर्यंत या लशीच्या निर्मितीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, या लशीच्या पहिले डोसेस हे भारतातच वापरले जाणार आहेत. पुढच्या वर्षी याबाबतचा संपूर्ण परवाना मिळणार आहे. तो मिळाल्यानंतर 50-50 टक्के प्रमाणात दक्षिण आशियातील देशांमध्ये या लशीचे वितरण केले जाणार आहे. गरिब देशांमध्ये लस खरेदी करुन वितरित करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटना करणार आहे. याबाबतचा करार सीरमने पाच विकासकांशी केला आहे. आतापर्यंत एस्ट्राझेनेका लशीचे चार कोटी डोस दोन महिन्यांत तयार करण्यात आले आहेत. 

डिंसेबरमध्ये ब्रिटनकडून आपत्कालीन परवाना मिळाल्यानंतर या लशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार असल्याची माहिती एस्ट्राझेनेकाचे सीईओ पास्कल सोरियॉट यांनी दिली आहे. या लशीचे निष्कर्ष अद्याप बाकी आहेत. फायझर इन्कॉर्पेरेशनची लसही या स्पर्धेत पुढे आहे. ती देखील 90 टक्के प्रभावी आहे. मात्र, ही लस वजा 70 अंश तापमानाला ठेवावी लागते. सगळीकडेच अशी सुविधा असेलच असं नाही म्हणूनच फायझरपेक्षा एस्ट्राझेनेकाची लसच सोयीची आहे.  

आदर पूनावाला यांनी पुढे  सांगितलं की, संपूर्ण जगभरात 2024 पर्यंत लशीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. कोरोनाचा संपूर्ण प्रादुर्भाव कमी व्हायला कमीतकमी दोन वर्षे तरी लागतील. या लशीच्या उत्पादनातील तसेच ती परवडणारी होण्यासाठी अडचणी दुर व्हायला हव्यात. लस उपलब्ध झाल्यावर आधी ती फ्रंटलाईन वर्कर्स आणि वयोवृद्धांना देण्यात येईल. संपूर्ण भारताचे लशीकरण लवकरात लवकर करणे हे मोठे आव्हान असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com